असगार्ड अल्कोबेवच्या नफ्यात 1400 टक्क्यांहून अधिक वाढ
दुसऱ्या तिमाहीत महसूल दुपटीपेक्षा जास्त मुंबई, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : मद्यनिर्मिती क्षेत्रातील असगार्ड अल्कोबेव लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीतील महसू
Asgard Alcobev


* दुसऱ्या तिमाहीत महसूल दुपटीपेक्षा जास्त

मुंबई, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : मद्यनिर्मिती क्षेत्रातील असगार्ड अल्कोबेव लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीतील महसूल मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 102.840 टक्क्यांनी वाढून 48.93 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या करपश्चात नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 1402 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. उत्पादन क्षमता वापरात झालेली वाढ, खर्चावरील नियंत्रण आणि कार्यक्षम व्यवस्थापन यामुळे कंपनीच्या नफ्यात सुधारणा झाल्याचे समोर आले आहे.

असगार्ड अल्कोबेव लिमिटेडने 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे अनऑडिटेड एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने फेब्रुवारी 2026 मध्ये सीएमजे ब्रेवेरिज प्रायव्हेट लिमिटेड मधील (CMJ Breweries Private Limited) नियंत्रक हिस्सा संपादन केल्यानंतर मद्यनिर्मिती व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. या व्यावसायिक बदलाचे सकारात्मक परिणाम आता कंपनीच्या आर्थिक कामगिरीत दिसू लागले आहेत.

महसूल 48.93 कोटींवर

आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 4863 लाख रुपये म्हणजेच 48.93 कोटी रुपये नोंदवण्यात आला. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत हा महसूल 24.12 कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर महसुलात 102.84 टक्क्यांची वाढ झाली आहे.

पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कंपनीने 101.93 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मागील वर्षाच्या तुलनेत यात 125.17 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीच्या एकूण नफाक्षमतेतही सुधारणा झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्रॉस प्रॉफिट 27.98 कोटी रुपये नोंदवण्यात आला. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन 57.18 टक्क्यांवर पोहोचले आहे.

EBITDA मध्ये 42 टक्क्यांची तिमाही वाढ

कंपनीच्या कार्यकारी नफ्यातही लक्षणीय सुधारणा झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत EBITDA 7.33 कोटी रुपये नोंदवण्यात आला. पहिल्या तिमाहीत हा आकडा 5.15 कोटी रुपये होता. त्यामुळे तिमाही आधारावर EBITDA मध्ये 42.310टक्क्यांची वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, EBITDA मार्जिनमध्येही मोठी सुधारणा झाली आहे. पहिल्या तिमाहीतील 9.71 टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत हे मार्जिन 14.98 टक्क्यांपर्यंत पोहोचले. म्हणजेच 5.27 टक्के-बिंदूंची वाढ झाली आहे.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा करपश्चात नफा 2.55 कोटी रुपये नोंदवण्यात आला. पहिल्या तिमाहीतील 1.69 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 50.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्या सहामाहीतील करपश्चात नफा 4.24 कोटी रुपये राहिला.

उत्पादन क्षमतेचा वापर 78.6 टक्क्यांवर

कंपनीच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा होण्यामागे उत्पादनातील वाढ हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 13.82 लाख केस बिअरचे उत्पादन केले. पहिल्या तिमाहीतील 11.65 लाख केसच्या तुलनेत उत्पादनात 18.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

याच कालावधीत कंपनीने 13.58 लाख केस उत्पादनाचा पुरवठा केला. पहिल्या तिमाहीत हा आकडा 11.91 लाख केस होता. त्यामुळे पुरवठ्यात 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा वापरही पहिल्या तिमाहीतील 63.1 टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत 78.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. उत्पादन यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर आणि खर्चाचे योग्य व्यवस्थापन यामुळे कंपनीला कार्यकारी स्तरावर फायदा होत असल्याचे चित्र आहे.

कॅन बिअरच्या उत्पादनात 67 टक्क्यांची वाढ

कंपनीच्या उत्पादन रचनेतही महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत. दुसऱ्या तिमाहीत कॅनमधील बिअरचे उत्पादन 4.99 लाख केसपर्यंत पोहोचले. पहिल्या तिमाहीत हे उत्पादन 2.97 लाख केस होते. त्यामुळे कॅन बिअरच्या उत्पादनात 67.7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एकूण उत्पादनातील कॅन बिअरचा वाटा पहिल्या तिमाहीतील 25.5 टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत 36.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कंपनीच्या उत्पादन मिश्रणात कॅन बिअरचे महत्त्व वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते.

कर्जाचा बोजा 11.7 कोटींनी कमी

कंपनीने उत्पादन आणि महसुलातील वाढीसोबतच आर्थिक स्थिती मजबूत करण्यावरही भर दिला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने एकूण कर्जामध्ये 11.70 कोटी रुपयांची कपात केली आहे.

31 मार्च 2026 रोजी कंपनीचे एकूण कर्ज 72.54 कोटी रुपये होते. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ते कमी होऊन 60.84 कोटी रुपयांवर आले आहे. कर्जाचा भार कमी करण्यासोबतच दीर्घकालीन कर्जाचा वाटा वाढवण्यावरही कंपनीने भर दिला आहे.

मार्च 2027 पर्यंत उत्पादन क्षमता 10.8 दशलक्ष केसपर्यंत वाढवणार

वाढत्या मागणीचा विचार करून असगार्ड अल्कोबेवने उत्पादन क्षमता विस्ताराची योजना आखली आहे. सध्या कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 84 लाख केस आहे. ती मार्च 2027 पर्यंत 1 कोटी 8 लाख केसपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच उत्पादन क्षमतेत सुमारे 28.6 टक्क्यांची वाढ होणार आहे.

या विस्तारासाठी कंपनीच्या स्वयंचलित मद्यनिर्मिती आणि पॅकेजिंग यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. तसेच ईशान्य भारत आणि पूर्व भारतातील विद्यमान व्यवसायाचा विस्तार करत दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतातील बाजारपेठांमध्येही संधी शोधल्या जात आहेत.

याशिवाय, देशातील आघाडीच्या बिअर उत्पादक कंपन्यांसोबत कराराधारित उत्पादन भागीदारी अधिक मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे. दीर्घकालीन उत्पादन करारांमुळे नियमित उत्पादन आणि महसुलाच्या संधी वाढण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

आर्थिक वर्षात 24 ते 28 कोटी EBITDA चे लक्ष्य

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोनक जैन यांनी दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. उत्पादन क्षमतेचा अधिक चांगला वापर, खर्चातील बचत आणि कार्यकारी कार्यक्षमतेत झालेली सुधारणा यामुळे नफ्यात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये कंपनीने 24 ते 28 कोटी रुपयांचा EBITDA मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. उत्पादनाचे वाढते प्रमाण, खर्चावरील नियंत्रण आणि उत्पादन क्षमतेचा अधिक प्रभावी वापर या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

एकूणच, मद्यनिर्मिती व्यवसायातील प्रवेशानंतर असगार्ड अल्कोबेवने महसूल, उत्पादन, नफा आणि कर्ज व्यवस्थापन या आघाड्यांवर सुधारणा नोंदवली आहे. आगामी काळात उत्पादन क्षमतेचा विस्तार, नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी यावर कंपनीची वाढ अवलंबून असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande