ईश्वरी सावकार च्या नेतृत्वात हैदराबादवर महाराष्ट्राचा मोठा विजय
Maharashtra's big win over Hyderabad under the leadership of Ishwari Savkar
Maharashtra's big win over


बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी स्पर्धा

नाशिक, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची खेळाडू ईश्वरी सावकार हिच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बीसीसीआयच्या एलिट गटातील टी-ट्वेंटी स्पर्धेत हैदराबाद संघावर ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात नाशिक महिला प्रीमियर लीगमधील (NWPL) खेळाडू आणि मालेगावची ज्ञानदा निकम हिनेही फलंदाजीद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १६८ धावांची दमदार मजल मारली. सलामीला फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार ईश्वरी सावकार हिने अवघ्या १९ चेंडूंत ३३ धावा फटकावल्या. तिच्यासोबत सलामीला आलेल्या ज्ञानदा निकम हिने ३० चेंडूंत ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघींच्या योगदानामुळे महाराष्ट्राला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाला महाराष्ट्राच्या गोलंदाजांसमोर फारसा प्रतिकार करता आला नाही. महाराष्ट्राच्या प्रभावी गोलंदाजीपुढे हैदराबादचा संपूर्ण संघ १७.५ षटकांत अवघ्या ६८ धावांवर गारद झाला. त्यामुळे महाराष्ट्राने हा सामना ९२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने २३ वर्षांखालील महिलांसाठी एलिट गटातील टी-ट्वेंटी साखळी सामन्यांचे आयोजन भिलाई आणि रायपूर येथे १४ नोव्हेंबरपासून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संघाचे आगामी साखळी सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत :

१५ नोव्हेंबर : बिहारविरुद्ध

१९ नोव्हेंबर : कर्नाटकविरुद्ध

२१ नोव्हेंबर : झारखंडविरुद्ध

हैदराबादविरुद्धच्या शानदार विजयामुळे महाराष्ट्राच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, आगामी सामन्यांमध्येही विजयी कामगिरी कायम राखण्याचे आव्हान संघासमोर असणार आहे. ईश्वरी सावकारच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाच्या या कामगिरीचे क्रिकेटप्रेमींकडून कौतुक होत आहे. विशेषतः नाशिकची ईश्वरी सावकार आणि मालेगावची ज्ञानदा निकम यांच्या योगदानामुळे जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande