नांदगावमध्ये ५५ गोणी कांद्याची चोरी
Thieves are also paying attention after onion prices increased
नांदगावमध्ये ५५ गोणी कांद्याची चोरी


नांदगाव, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : कांद्याचे बाजारभाव वाढू लागल्याने आता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी खळ्यांमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोण्यांवर चोरट्यांची नजर पडली असून, नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे कांदा चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या खळ्यातून तब्बल ५५ गोणी कांदा चोरून नेला असून, या घटनेत सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ कांद्यानंतर आता लाल कांद्याची बाजारात आवक सुरू झाली आहे. दिवाळीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरू झाल्याने लाल कांद्याची आवक वाढत असली, तरी बाजारभाव प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. कांद्याची वाढती मागणी आणि उपलब्ध उत्पादनातील तफावत यामुळे बाजारभावाला चांगला दर मिळत आहे. मात्र, वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी चोरट्यांनीही आता कांद्याच्या साठ्यावर आणि कांद्याच्या शेतांवर लक्ष केंद्रित केल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी अशोक पेंढारकर यांनी मल्हारवाडी येथील आपल्या खळ्यात विक्रीसाठी सुमारे एक हजार गोणी कांदा साठवून ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खळ्याचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला आणि त्यातील ५५ गोणी कांदा चोरून नेला. बाजारभावानुसार चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत सुमारे १ लाख ५ हजार रुपये असल्याने व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, मागील पंधरा दिवसांतील कांदा चोरीची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता शेतमालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande