नाशिकमध्ये तीन महिलांचा विनयभंग; गुन्हे दाखल
Three women molested in the city
नाशिकमध्ये तीन महिलांचा विनयभंग; गुन्हे दाखल


मुंबई नाका, सिडको आणि नाशिकरोड परिसरातील घटना एका आरोपीला अटक, दोघांविरुद्ध गुन्हे

नाशिक, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : शहर परिसरात महिलांच्या विनयभंगाच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. मुंबई नाका, सिडको आणि नाशिकरोड परिसरात घडलेल्या या घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अन्य दोन प्रकरणांचा तपास सुरू आहे.

मुंबई नाका परिसरात महिलेचा हात पकडून झटापट

विनयभंगाची पहिली घटना मुंबई नाका परिसरात घडली. फिर्यादी महिला आपल्या भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात असताना नानावली, जुने नाशिक येथील नदिम शौकत शेख (वय ४०) हा तिच्याजवळ आला. त्याने महिलेला धमकीवजा अश्लील भाषा वापरून तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिला घाबरून पार्किंगच्या दिशेने जात असताना आरोपीने तिचा हात पकडून तिच्याशी झटापट केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नदिम शेख याला अटक करण्यात आली आहे.

सिडकोत मोबाईलवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले

दुसरी घटना सिडकोतील पवननगर परिसरात घडली. १० नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादी महिला घरी असताना आरोपी पंकज गोसावी याने तिच्या मोबाईलवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले. तसेच फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

नाशिकरोडला व्हॉट्सॲप मेसेज आणि फोनद्वारे त्रास

तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. छत्रपती संभाजीनगर येथील योगेश भगवान शहाणे (वय ३५) याने रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घरी असलेल्या महिलेच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप संदेश पाठवून तसेच फोन करून अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अल्पावधीत महिलांच्या विनयभंगाच्या तीन घटना समोर आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या तिन्ही प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास करण्यात येत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande