
तेहरान, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेजवळ गॅस रिफायनरीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळी पश्चिम इराणमधील इलाम प्रांतात (रोजहेलात) तेल आणि वायू क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस उलटली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.ही बस ‘देहलोरान एनजीएल ३१००’ या तेल आणि वायू प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सुमारे ७ वाजून २५ मिनिटांनी देहलोरानजवळील ‘दश्त अब्बास-मुर्मुरी’ मार्गावर हा अपघात झाला.
इराणची अधिकृत वृत्तसंस्था एजन्सी’ने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून १२ झाली आहे. यापूर्वी प्रांतीय अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा नऊ असल्याचे सांगितले होते.दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जखमी झालेल्या १६ जणांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेनंतर इलाम प्रांतात एक दिवस, तर अब्दानान शहरात दोन दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक जण अब्दानान येथील रहिवासी होते.
वृत्तानुसार, अब्दानानचे सरकारी अभियोक्ता अमरुल्लाह मिसाई यांनी सांगितले की, या अपघाताचे नेमके कारण, दुर्घटनेला कारणीभूत ठरलेले घटक तसेच कोणाकडून निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी सुरू आहे.ते पुढे म्हणाले की, एखादी व्यक्ती किंवा जबाबदार संस्था दोषी अथवा निष्काळजी आढळल्यास संबंधितांविरोधात कोणतीही सवलत न देता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode