
इस्लामाबाद, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानात दहशतवाद्यांना आता मृत्यूची भीती सतावू लागली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले हाफिज सईद आणि मसूद अझहर या दोन दहशतवाद्यांना गेल्या आठवडाभरात पाकिस्तानमध्ये गुपचूपपणे नव्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. हे दोघेही आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) संचालित कडेकोट सुरक्षा असलेल्या सुरक्षित ठिकाणी (सेफ हाऊस) असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला लाहोरमधील जोहर टाउन येथून रावळपिंडीतील गॅरिसन ग्राउंड परिसरात हलवण्यात आले आहे. हा परिसर पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ आहे. तर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला सिंध प्रांतातील नवाबशाह येथील एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवाद्यांची प्रमुख तळ आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्यानंतर भारताकडून पुन्हा हल्ले होण्याची भीती त्यांना सतावत आहे. याशिवाय, अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये भारतविरोधी अनेक दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या ‘अज्ञात बंदूकधाऱ्यां’ची भीतीही या दोघांना वाटत आहे.
या भीतीमुळे हाफिज सईदने लष्कर-ए-तोयबाच्या सदस्यांना प्रत्यक्ष भेटणेही बंद केले आहे. आता तो केवळ ध्वनिसंदेशांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्याच्या हालचालींवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, हाफिज सईद लाहोरमधील कोट लखपत कारागृहात दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणा हा केवळ दिखावा असल्याचे मानतात. त्यांच्या मते, सईद प्रत्यक्षात एका सुरक्षित ठिकाणी आरामात राहत आहे.
दरम्यान, जैश-ए-मोहम्मदलाही मोठा धक्का बसला आहे. बहावलपूर येथील या संघटनेच्या मुख्यालयाचे म्हणजेच ‘मरकज’चे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून ही संघटना पुन्हा संघटनात्मक बांधणी करण्यासाठी संघर्ष करत आहे.मसूद अझहरही आपल्या संघटनेच्या सदस्यांशी थेट संपर्क टाळत आहे. तो केवळ काही निवडक व्यक्तींच्या संपर्कात असून, त्यात संघटनेच्या काही वरिष्ठ कमांडरांचाही समावेश आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी या दोघांनाही जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी वाँटेड आहे. तर मसूद अझहर हा पुलवामा, पठाणकोट आणि संसदेवरील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे.गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सध्या हे दोन्ही दहशतवादी तुरुंगात नसून सुरक्षा यंत्रणांच्या संरक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी राहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode