
कीव, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेने युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देण्याच्या बदल्यात डोनबासचा प्रदेश रशियाच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात याबाबत खुलासा केला. या चर्चेमुळे पश्चिमी लष्करी संघटना असलेल्या नाटोमध्ये युक्रेनच्या सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,थंडीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. यापूर्वी अबू धाबी येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळांमध्ये दोन दिवस चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही.झेलेन्स्की यांनी सांगितले की, अमेरिकेच्या प्रतिनिधींनी चर्चेदरम्यान एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जर युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाला, तर तो डोनबासमधून माघार घेईल का? पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
झेलेन्स्की पुढे म्हणाले, युक्रेनला अशा प्रकारची संरक्षण मदत देणे, आमच्या सैन्याची ताकद आणि संरक्षण क्षमता लक्षात घेता, पाश्चिमात्य देश युक्रेनला अशा प्रकारे एकटे सोडू शकत नाहीत. या चर्चेमुळे युक्रेनच्या नाटो सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या अजेंड्यावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युक्रेन गेल्या अनेक वर्षांपासून नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, रशिया याकडे आपल्या सुरक्षेसाठी धोका म्हणून पाहतो. तसेच, हा मुद्दा आपली 'रेड लाइन' असल्याचे रशियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तथापि, झेलेन्स्की यांच्या या दाव्यावर नाटो आणि अमेरिकेने अद्याप थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, हे युद्ध संपवण्यासाठी मार्ग शोधण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू. संवेदनशील चर्चेसाठी आवश्यक असलेली गोपनीयता जपणे हे देखील आमचे प्राधान्य आहे. चर्चेदरम्यान अनेक नवीन कल्पना समोर आल्या असून त्यावर विचारविनिमय सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.या आठवड्यात झालेल्या बैठकांमध्ये युद्ध संपवण्यासाठी भविष्यात होणाऱ्या चर्चेत युरोपीय देशांचाही सहभाग असेल, यावर सहमती झाली. शुक्रवारी डब्लिन येथे युरोपने फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि पोलंड या पाच देशांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निवडले.
दरम्यान, रशियाने शनिवारीही युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले. पूर्वेकडील पावलोह्राद शहरात आणि झापोरिझ्झियाजवळील एका गावात रशियन हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला.झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेन पाश्चिमात्य देशांसोबत सुरक्षा हमीबाबत चर्चा करत आहे. कोणताही करार स्वीकारायचा की नाही, याचा अंतिम निर्णय युक्रेनचे नागरिकच घेतील. तसेच, रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही प्रदेशाला युक्रेन रशियाचा भाग म्हणून मान्यता देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode