
तेहरान, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच इराणचे सर्वोच्च वाटाघाटी प्रतिनिधी मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे.
इराणची अर्धसरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, गालिबाफ यांनी रविवारी संसदेत बोलताना म्हटले की, “अमेरिका चर्चेचा मार्ग निवडते की युद्धाचा, याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. अमेरिकेने आमच्या सात रास्त अटी मान्य केल्या, तर करारासाठीचे दरवाजे खुले राहतील.” गालिबाफ पुढे म्हणाले की, “अमेरिकेने आणखी एक चूक केली, तर युद्धाचे मैदान कुठे असेल, हे इराणचे शक्तिशाली सशस्त्र दल ठरवतील.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे नव्याने हल्ले करून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी देत आहेत, तर दुसरीकडे तणाव कमी करण्याबाबतही बोलत आहेत. अशा परिस्थितीत गालिबाफ यांनी हे विधान केले आहे. अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेले होते.
या हल्ल्यानंतर इराणने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत युद्ध भडकले. परिणामी, जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली. या सामुद्रधुनीतील वाहतूक बंद झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode