चिल्लर उचलण्याच्या बहाण्याने सहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!
रायगड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। पेण ते खोपोली असा एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगेतील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकारामुळे एसटी बसमधील प्रवाशांच्या सु
Jewelry-worth-six-lakhs-stolen


रायगड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। पेण ते खोपोली असा एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगेतील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकारामुळे एसटी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला एसटी बस क्रमांक एमएच-२० बीएल-३२१७ मधून पेण ते खोपोली असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान खालापूर तालुक्याच्या हद्दीत दोन अनोळखी महिला त्यांच्याजवळ आल्या. त्यापैकी एक महिला फिर्यादी यांच्या सीटवर बसली होती. तिच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाच्या हातातील चिल्लर सीटखाली पडली. ही चिल्लर उचलून देण्याच्या बहाण्याने संबंधित महिलेने फिर्यादी यांचे लक्ष विचलित केले.

याच संधीचा फायदा घेत दोन्ही अनोळखी महिलांनी फिर्यादी यांच्या बॅगेतील दागिन्यांच्या बॉक्समधून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. काही वेळाने दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दबडे करीत आहेत. बसमधून प्रवास करताना अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande