
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांचे आवाहन
: जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर अंतर्गत निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे दाखले (Life Certificate) जीवन प्रमाण (Jeevan Pramaan) या डिजिटल प्रणालीमध्ये 100 टक्के नोंदविण्याच्या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर येथे कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक शिकायत व पेंशन मंत्रालयाच्या पेंशन व पेंशनभोगी कल्याण विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे विभागाचे प्रधान सचिव आणि संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या 16 नोव्हेंबर 2026 रोजीच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.
निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. यासाठी शासनाने जीवन प्रमाण ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीद्वारे निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने आपला हयातीचा दाखला नोंदविता येतो. या सुविधेचा अधिकाधिक लाभ निवृत्तीवेतनधारकांना मिळावा तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांची हयातीची प्रमाणपत्रे जीवन प्रमाण प्रणालीमध्ये नोंदविण्याचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर अंतर्गत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जीवन प्रमाण प्रणालीमध्ये हयातीचा दाखला नोंदवून घ्यावा. संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी निर्धारित कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा कोषागार कार्यालयात उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मेळाव्यास येताना सोबत पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे.
निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल प्रणालीचा लाभ घेता यावा, हयातीच्या दाखल्यांची नोंदणी सुलभतेने पूर्ण व्हावी आणि कोणताही पात्र लाभार्थी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तरी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 18 ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हयातीचा दाखला जीवन प्रमाण प्रणालीमध्ये नोंदवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला भा. पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis