
रायगड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगडच्या राजकीय आखाड्यात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाची ठिणगी पडलेली असतानाच खासदार सुनील तटकरे यांनी अभिमन्यू आणि चक्रव्यूहाचा दाखला देत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. ‘माझा अभिमन्यू झाला असेल, तर चक्रव्यूह कसा भेदायचा, हेही मला माहीत आहे,’ या त्यांच्या विधानाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अलिबाग येथील पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय टीकेला प्रत्युत्तर देतानाच विकासकामांचा लेखाजोखाही मांडला.
पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नियुक्तीनंतर आपण त्यांचे अभिनंदन केले होते. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. मात्र, अलीकडील राजकीय वक्तव्यांवर बोलताना तटकरे यांनी उपरोधिक शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. प्रत्येक टीकेला उत्तर देण्यापेक्षा शांतपणे काम करणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या राजकीय अनुभवाची आठवण करून दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले, हाच टीकाकारांना दिलेला ठोस जवाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील पाच पुलांची कामे, अलिबाग-वडखळ रस्त्याचे रुंदीकरण आणि रोहा येथील १२० कोटींचा ट्रिपल आयटी प्रकल्प यांची माहिती त्यांनी दिली. औद्योगिक विकासाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
दिवंगत अजित पवार यांच्याविषयी आपली निष्ठा आणि आदर कायम असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
एकीकडे गोगावले यांच्याशी मतभेदांच्या चर्चा, तर दुसरीकडे चक्रव्यूह भेदण्याचा निर्धार व्यक्त करणारे तटकरे, यामुळे रायगडच्या राजकारणात पुढील काळात कोणती नवी खेळी रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)