‘जिवंत बाहेर पडणेही कठीण'; इमरान खान यांचे सर्वोच्च न्यायालयाला खुले पत्र
इस्लामाबाद, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांनी सोमवारी देशातील सर्वोच्च न्यायालयांसह प्रमुख न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून स्वतःसह पत्नी बुशरा बीबी यांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब
‘जिवंत बाहेर पडणेही कठीण'; इमरान खान यांचे सर्वोच्च न्यायालयाला खुले पत्र


इस्लामाबाद, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांनी सोमवारी देशातील सर्वोच्च न्यायालयांसह प्रमुख न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून स्वतःसह पत्नी बुशरा बीबी यांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. आपली प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याशिवाय, न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि तुरुंगातील सुविधा सुधाराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

इमरान खान यांचे वकील बॅरिस्टर सलमान सफदर यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर त्यांचे हे खुले पत्र प्रसिद्ध केले. गेल्या आठवड्यात त्यांनी अदियाला तुरुंगात इमरान खान यांची भेट घेतली होती. ७४ वर्षीय इमरान खान यांनी सर्वोच्च न्यायालय, फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आपल्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, वयाच्या ७४व्या वर्षी सातत्याने अशा परिस्थितीत राहिल्यामुळे मी अशा अवस्थेत पोहोचलो आहे, जिथून कदाचित पुन्हा जिवंत परतणेही शक्य होणार नाही.दीर्घकाळ एकांत कारावासात ठेवल्यामुळे आणि योग्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे आपली प्रकृती खालावत असल्याचा दावा इमरान खान यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत पोहोचला आहे. डॉक्टरांनी त्यांना मेंदूत रक्तस्राव होण्याचा तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही असल्याचे सांगितले आहे.

इमरान खान यांनी पत्नी बुशरा बीबी यांच्या प्रकृतीचाही मुद्दा उपस्थित केला आहे. बुशरा यांच्या डोळ्यांची दृष्टी सातत्याने कमी होत असून, त्यांना पुन्हा डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते, असा आरोप त्यांनी केला आहे.एप्रिल महिन्यात बुशरा बीबी यांना रेटिना डिटॅचमेंटची समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांना पुन्हा एकांत कारावासात पाठवण्यात आले. तसेच डॉक्टरांना भेटण्याची आणि वैद्यकीय अहवाल मिळवण्याची परवानगीही नाकारण्यात आल्याचा दावा इमरान खान यांनी केला आहे.

इमरान खान यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांना त्यांना इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्याची परवानगी देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. ते म्हणाले, मी माननीय न्यायाधीशांकडे कोणत्याही विशेष सवलतीची मागणी करत नाही. न्यायाच्या दृष्टीने माझी एवढीच विनंती आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि आमच्या आरोग्यविषयक समस्यांवर योग्य उपचार उपलब्ध करून द्यावेत.

इमरान खान यांनी आपल्याला दिवसातील तब्बल २२ तास एकांत कारावासात ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची, पुस्तके वाचण्याची तसेच दूरचित्रवाणी पाहण्याची सुविधाही दिली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वकिलांसोबतच्या भेटींवरही मर्यादा घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.तुरुंगातील वैद्यकीय मंडळाने आपल्या चिंता आणि मानसिक तणावाचा उल्लेख केला होता, असेही त्यांनी सांगितले. पत्नी आणि कुटुंबीयांशी अधिक वेळा संवाद साधण्याची संधी देण्यासोबतच वाचनासाठी पुस्तके आणि दूरचित्रवाणी उपलब्ध करून देण्याची शिफारस या मंडळाने केली होती.

इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोशाखाना-२ प्रकरणात १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण २०२१ मध्ये अधिकृत दौऱ्यादरम्यान सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स यांनी इमरान खान यांना भेट दिलेल्या बुल्गारी कंपनीच्या महागड्या दागिन्यांच्या संचाच्या खरेदीशी संबंधित आहे.

इमरान खान ऑगस्ट २०२३ पासून विविध प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नीला जानेवारी २०२५ मध्ये भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.इमरान खान इतर प्रकरणांमध्येही तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ सातत्याने असा आरोप करत आला आहे की,इमरान खान यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande