‘आम्ही तुम्हाला शोधून काढू’; इराणची अमेरिकन नौदलातील दोन अधिकाऱ्यांना धमकी
तेहरान, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।इराणने अमेरिकन नौदलातील दोन अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निवेदन प्रसिद्ध करून या दोन अधिकाऱ्यांवर फेब्रुवारी महिन्यातील संघर्षादरम्यान मिनाब य
‘आम्ही तुम्हाला शोधून काढू’; इराणची अमेरिकन नौदलातील दोन अधिकाऱ्यांना धमकी


तेहरान, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।इराणने अमेरिकन नौदलातील दोन अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निवेदन प्रसिद्ध करून या दोन अधिकाऱ्यांवर फेब्रुवारी महिन्यातील संघर्षादरम्यान मिनाब येथील शाळेवर झालेल्या हल्ल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात १६८ मुलांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांना शोधून काढणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

दूतावासाने आठ महिन्यांपूर्वीची आपली एक पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संबंधित अमेरिकन अधिकाऱ्यांना ‘गुन्हेगार’ संबोधण्यात आले होते. जुन्या पोस्टचा संदर्भ देत दूतावासाने अवघ्या चार शब्दांत, ‘आम्ही तुम्हाला शोधून काढू,’ असा इशारा दिला आहे.दूतावासाने या अधिकाऱ्यांची ओळखही उघड केली आहे. कमांडर ली आर. टेट हे यूएसएस स्प्रान्स या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर, तर लेफ्टनंट कमांडर जेफ्री ई. यॉर्क हे त्याच युद्धनौकेचे कार्यकारी अधिकारी आहेत. २९ मार्च रोजीच्या पोस्टमध्ये म्हटले होते, ‘या दोन गुन्हेगारांना लक्षात ठेवा. कमांडर ली आर. टेट आणि यूएसएस स्प्रान्सचे कार्यकारी अधिकारी जेफ्री ई. यॉर्क यांनी तीन वेळा टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिले होते.’

फेब्रुवारी महिन्यात इराणविरोधात अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे एक क्षेपणास्त्र मिनाब येथील शजरे तैय्यबेह शाळेवर कोसळले होते. या हल्ल्यात १२३ मुलांसह किमान १६८ जणांचा मृत्यू झाला होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला अमेरिकन अधिकाऱ्यांवर हल्ला न करण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या एक दिवसात इराणकडून ही धमकी देण्यात आली आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना म्हटले होते की, एखाद्या वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याची हत्या झाल्यास इराणचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही.दरम्यान, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांना तेहरानशी संबंधित व्यक्तींकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वॉशिंग्टनमधील निवासस्थानावरून त्यांना हलवून एका लष्करी तळावर ठेवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande