पाण्याची नासाडी रोखण्यासाठी लातूर महापालिकेची मोहीम; २७,५१२ घरांचे सर्वेक्षण
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनियमितता दूर करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. शहरातील अनधिकृत नळ जोडण्या, नळांना तोट्या नसणे, पाण्याचा अपव्यय आणि
पाणी टंचाई


लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

लातूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनियमितता दूर करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. शहरातील अनधिकृत नळ जोडण्या, नळांना तोट्या नसणे, पाण्याचा अपव्यय आणि नळ जोडणीतील अनियमितता शोधण्यासाठी १८ पथकांमार्फत सर्वेक्षण व तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत तब्बल २७ हजार ५१२ घरांना भेटी देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १६४ नागरिकांच्या नळ जोडण्यांना तोट्या बसविण्यात आल्या आहेत.

१८ पथकांमार्फत शहरात सर्वेक्षण

लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये १८ पथके नियुक्त करण्यात आली असून, ही पथके घरोघरी जाऊन नळ जोडण्यांची तपासणी करत आहेत.

तपासणीदरम्यान अनधिकृत नळ जोडण्या, नळांना तोट्या नसणे, पाण्याचा अनावश्यक वापर तसेच नळ जोडणीतील इतर अनियमितता आढळल्यास संबंधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. अनधिकृत नळ जोडण्या आढळलेल्या नागरिकांना नियमानुसार जोडण्या करून घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

२६७ नागरिकांना नोटिसा; २५ जणांवर दंडात्मक कारवाई

या सर्वेक्षणादरम्यान आतापर्यंत शहरातील २७ हजार ५१२ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २६७ नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच २५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नळांना तोट्या नसल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी १६४ नागरिकांच्या नळ जोडण्यांना नवीन तोट्या बसविण्यात आल्या आहेत.

याशिवाय शहरातील जलवाहिन्यांना असलेल्या गळतीच्या ठिकाणांची पाहणी करून दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

शहरात ६ हजार ४५७ वैयक्तिक बोअरवेल

महानगरपालिकेच्या सर्वेक्षणातून लातूर शहरात एकूण ६ हजार ४५७ वैयक्तिक बोअरवेल असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच पाण्याचा वापर आणि उपलब्ध जलस्रोतांची माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरत आहे.

नागरिकांना महानगरपालिकेचे आवाहन

पाण्याचा अपव्यय रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लातूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या नळ जोडणीची तपासणी करून घ्यावी, प्रत्येक नळाला योग्य तोटी बसवावी, मोटारीद्वारे पाणी उपसा करू नये, अनधिकृत नळ जोडणी करू नये आणि पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande