ट्रम्प यांच्या फिलिपिन्स दौऱ्याला विरोध; मनिलात आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट
मनिला, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे रविवारी शेकडो आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. हे आंदोलक आसियान देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषद स्थळाच्या दिशेने मोर्चा काढत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्तावित
ट्रम्प यांच्या फिलिपिन्स दौऱ्याला विरोध; मनिलात आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट


मनिला, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे रविवारी शेकडो आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. हे आंदोलक आसियान देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषद स्थळाच्या दिशेने मोर्चा काढत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्तावित फिलिपिन्स दौरा आणि मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. ट्रम्प यांचा फिलिपिन्स दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मध्यावधी निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

वृत्तानुसार, फिलिपिन्समध्ये लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या ‘न्यू पॅट्रियॉटिक अलायन्स’ या आघाडीतील आंदोलकांनी शिखर परिषद स्थळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवल्याने दोन्ही बाजूंमध्ये झटापट सुरू झाली.४९ व्या आसियान नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अनेक आंदोलनांपैकी हे एक आंदोलन होते. आंदोलकांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावित दौऱ्याला विरोध करण्यासोबतच प्रादेशिक प्रश्नही उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आंदोलनाचे नेते टेडी कॅसिनो यांनी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्यावर टीका केली. परदेशी नेत्यांचे स्वागत करण्यात मार्कोस व्यस्त आहेत; मात्र देशातील जनतेच्या समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनकर्त्या नेत्यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आमचा संदेश स्पष्ट आहे. तुमचे येथे स्वागत नाही, असे म्हटले.अमेरिका आणि चीन यांच्यात जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी स्पर्धा तीव्र होत असताना, या आठवड्यात अनेक देशांचे नेते विविध उच्चस्तरीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी फिलिपिन्समध्ये दाखल होत आहेत.

फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसियान शिखर परिषदेच्या मुख्य बैठका संपल्यानंतर मंगळवारी दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत मनिला येथे दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा मार्कोस आसियान संघटनेचे वार्षिक अध्यक्षपद सिंगापूरकडे सोपवणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande