
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
आठ दिवसांचा पायी प्रवास; २४ नोव्हेंबरला कपिलधार येथे सांगता, लाखो शिवभक्त सहभागी होण्याची शक्यता
- महाराष्ट्रासह परराज्यांतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चापोली ते कपिलधार महापदयात्रेचे यंदा ७२ वे वर्ष आहे. मंगळवार, १७ नोव्हेंबरला चापोली येथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, २४ नोव्हेंबरला श्रीक्षेत्र कपिलधार येथे तिची सांगता होईल. यंदा लाखो भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याने मार्गावरील गावांमध्ये स्वागत आणि सेवाकार्याचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रसंत प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या पदयात्रेला सात दशकांची परंपरा आहे. गावोगावी भाविकांकडून अन्नदानासह विविध सेवा दिल्या जातात. १७ नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता चापोलीतून प्रस्थान करून चाकूर येथे। पहिला मुक्काम असेल. १८ नोव्हेंबरला मोहनाळ-वडवळमार्गे जानवळ, १९ ला कारेपूरमार्गे पानगाव, २०ला पट्टीवडगाव-घाटनांदूरमार्गे पुस, २१ ला नागझरा-अंबाजोगाईमार्गे लोखंडी सावरगाव, २२ ला होळमार्गे
केज, तर २३ ला उमरी मसाजोग-बरडमार्गे सारूळ फाटा येथे मुक्काम असेल. २४ नोव्हेंबरला पदयात्रा श्रीक्षेत्र कपिलधार येथे पोहोचेल.
पहाटे शिवपाठाने दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता शिवपाठ, प्रार्थना आणि महाराजांच्या आशीर्वचनाने दिवसाची सुरुवात होईल. दुपारी भोजन व विश्रांतीनंतर तीन वाजता पुन्हा पदयात्रा मार्गस्थ होईल. यात्रेत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, प.पू. १०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज (शिरूर अनंतपाळकर), आचार्य गुरुराज स्वामी, प.पू. संगणबसव महास्वामी (निलंगा) आणि प.पू. बालानंद महाराज यांच्यासह अनेक गुरुवर्य सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रासह
परराज्यांतील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पदयात्रा समितीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis