
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
: युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश रुजविण्यासोबतच त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लातूरमध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘नशामुक्त युवा – विकसित भारतासाठी’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विकसित भारत नेतृत्व संवाद २०२७ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींनी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे.
पाच विविध स्पर्धांचे आयोजन
या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा पाच स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महोत्सवातील सर्व सांस्कृतिक स्पर्धा नशामुक्त युवा आणि विकसित भारत या संकल्पनेवर आधारित असणार आहेत. युवकांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे.
विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर संधी
जिल्हास्तरीय स्पर्धांमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणारे संघ पुढील विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुणवंत युवक-युवतींना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
१५ ते २९ वयोगटातील युवकांना सहभागाची संधी
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवकांचे वय १७ ऑगस्ट २०२६ रोजी १५ ते २९ वर्षे असणे आवश्यक आहे. सहभागी युवक हा लातूर जिल्ह्याचा रहिवासी किंवा जिल्ह्यात शिक्षण घेणारा असावा. एका युवकाला केवळ एकाच स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. यापूर्वी व्हीबीवायएलडी-२०२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक या स्पर्धेसाठी पात्र राहणार नाहीत.
चित्रकला आणि कविता लेखन स्पर्धेतील साहित्य पूर्णपणे मौलिक असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावणारा मजकूर किंवा वेशभूषा स्पर्धेत स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके
महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
समूह लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
समूह लोकगीत आणि पथनाट्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ हजार ५०० रुपये पारितोषिक मिळणार आहे.
तर कविता लेखन आणि चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला १ हजार ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
२१ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक
या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ‘माय भारत’ संकेतस्थळावर तसेच खालील ऑनलाइन अर्जाद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी अर्जाची लिंक :
https://forms.gle/fdEVMwRqZDPhDe4y5
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती, महाविद्यालये, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि युवा मंडळांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. युवकांनी आपल्या कला आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून नशामुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis