बांगलादेशातील राजकीय पडसाद लंडनमध्ये; हसीना-नाहिद समर्थकांमध्ये हाणामारी, अनेक जण जखमी
लंडन, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशातील राजकीय पक्षांमधील संघर्ष आता देशाच्या सीमाही ओलांडून परदेशात पोहोचला आहे. लंडनमध्ये सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि नॅशनल सिटिझन्स पार्टी (एनसीपी)चे नेते नाहिद इस्लाम यांच्या समर्थकांम
बांगलादेशातील राजकीय संघर्ष लंडनमध्ये; हसीना-नाहिद समर्थकांमध्ये हाणामारी, अनेक जण जखमी


लंडन, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशातील राजकीय पक्षांमधील संघर्ष आता देशाच्या सीमाही ओलांडून परदेशात पोहोचला आहे. लंडनमध्ये सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि नॅशनल सिटिझन्स पार्टी (एनसीपी)चे नेते नाहिद इस्लाम यांच्या समर्थकांमध्ये हिंसक हाणामारी झाली. या संघर्षात अनेक जण जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाहिद इस्लाम सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये पक्षाच्या समर्थकांना संबोधित करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी लंडनमधील मेफेअर व्हेन्यू येथेही त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एनसीपीने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे समर्थकही कार्यक्रमस्थळाबाहेर जमले होते. त्यांनी एनसीपीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अवामी लीगच्या समर्थकांनी एनसीपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरू झाला.

एनसीपीचे आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे संयुक्त सदस्य सचिव अलाउद्दीन मोहम्मद यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी काचेच्या बाटल्या आणि लोखंडी सळ्यांचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात किमान चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटिश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बांगलादेशच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, नाहिद इस्लाम मेफेअर व्हेन्यू येथील कार्यक्रमस्थळी नियोजित वेळेच्या तीन तास आधीच पोहोचले होते. त्यानंतर अवामी लीगचे समर्थक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढे हिंसाचाराला सुरुवात झाली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून नाहिद इस्लाम यांना मागील दरवाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी समुदायाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. परदेशात देशाची प्रतिमा मलिन करणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, एनसीपीचे नेते नाहिद इस्लाम यांनी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवर बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये अशांतता निर्माण करण्याचा आरोप केला आहे. तसेच, अवामी लीगसोबत सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) निर्णयावरही त्यांनी टीका केली. नाहिद इस्लाम यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत ब्रिटिश सरकारकडे घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande