सर्बियाचे मिग-२९ लढाऊ विमान कोसळले; वैमानिकाचा मृत्य
बेलग्रेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सर्बियाची राजधानी बेलग्रेडच्या वायव्येला मंगळवारी सर्बियन हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. राजधानी बेलग्रेडपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नोव्हा प
सर्बियाचे मिग-२९ लढाऊ विमान कोसळले; वैमानिकाचा मृत्यू


बेलग्रेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सर्बियाची राजधानी बेलग्रेडच्या वायव्येला मंगळवारी सर्बियन हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. राजधानी बेलग्रेडपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नोव्हा पाझोव्हा आणि स्टारा पाझोव्हा या दोन शहरांदरम्यानच्या शेतात ही दुर्घटना घडली. सर्बियाच्या सरकारी रेडिओ आणि दूरचित्रवाणीने या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.

अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमान कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिकाऱ्यांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सर्बियातील काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी या दुर्घटनेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये शेतात विमानाचे अवशेष जळताना दिसत आहेत. घटनास्थळाजवळ रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहनेही उभी असल्याचे दिसून येत आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकाचे नाव मेजर गोरान बुलाजिक असे होते. त्यांचा जन्म १९७३ मध्ये झाला होता. १९९६ मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. वृत्तानुसार, २००६ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्बियन सैन्याची आतापर्यंत १४ विमाने अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये १२ लढाऊ विमाने आणि दोन हेलिकॉप्टरचा समावेश आहे. या सर्व दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्बियन हवाई दलाच्या ताफ्यात १९८७ ते १९९१ या कालावधीत तयार करण्यात आलेल्या १४ मिग-२९ लढाऊ विमानांचा समावेश आहे. ही विमाने आता जुनी झाली आहेत. त्यामुळे सर्बिया आपल्या जुन्या मिग-२९ विमानांच्या ताफ्याच्या जागी आधुनिक लढाऊ विमाने आणण्याच्या तयारीत आहे.यासाठी सर्बियाने २०२४ मध्ये फ्रान्सकडून २.७ अब्ज युरो खर्चून १२ डसॉल्ट राफेल एफ-४ लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. या विमानांचा पुरवठा २०२८ पासून सुरू होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande