शेख हसीनांच्या मायदेशी परतीच्या चर्चेने बांगलादेशात तणाव; ढाका विमानतळाजवळ दोन स्फोट, ३ जण जखमी
ढाका, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या संभाव्य मायदेशी परतीवरून देशातील राजकीय तणाव वाढला आहे. संभाव्य राजकीय हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. याचदरम
शेख हसीनांच्या मायदेशी परतीच्या चर्चेने बांगलादेशात तणाव; ढाका विमानतळाजवळ दोन स्फोट, ३ जण जखमी


ढाका, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या संभाव्य मायदेशी परतीवरून देशातील राजकीय तणाव वाढला आहे. संभाव्य राजकीय हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. याचदरम्यान, सोमवारी रात्री ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ देशी बनावटीच्या दोन बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या. या स्फोटांमध्ये रस्त्यावरून जाणारे तीन नागरिक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला बॉम्ब हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील प्रवेशद्वाराजवळ, तर दुसरा बॉम्ब विमानतळाजवळील जसीमुद्दीन परिसरात उड्डाणपुलाजवळ फुटला. या घटनांनंतर संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.वृत्तानुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कमरुल इस्लाम तालुकदार यांनी सांगितले की, काही उपद्रवींनी दोन बॉम्बस्फोट घडवून आणले. यामध्ये रस्त्यावरून जाणारे तीन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. हे बॉम्ब उड्डाणपुलावरून फेकण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेख हसीना यांच्या संभाव्य मायदेशी परतीवरून बांगलादेशातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रेल्वेगाड्या, बस आणि बँकांना आग लावण्याच्या घटनांचाही समावेश आहे. यापैकी अनेक घटनांसाठी अवामी लीग आणि तिच्याशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबाबदार धरले आहे.मात्र, या बॉम्बस्फोटांचा शेख हसीना यांच्या संभाव्य परतीशी काही संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वृत्तानुसार, कोणत्याही प्रकारची जाळपोळ किंवा तोडफोड रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ढाका, गोपालगंज आणि अवामी लीगचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या अन्य जिल्ह्यांसाठी विशेष सुरक्षा योजना तयार केल्या आहेत. डिसेंबर महिनाभर या भागांमध्ये अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात येणार असून, संपूर्ण देशातील गुप्तचर यंत्रणांची देखरेखही वाढवण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) मोहम्मद अली हुसेन फकीर यांनी सर्व ६४ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, आठ महानगर क्षेत्रांचे पोलीस आयुक्त आणि आठ विभागांच्या उपमहानिरीक्षकांना विशेष निर्देश जारी केले आहेत. तोडफोडीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande