भारतीय नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या सागरी टेहळणी सेवेची 50 वर्षे पूर्ण
सुपर कॉन्स्टलेशनपासून पी-8आयपर्यंत, हिंदी महासागर आणि त्यापलीकडील सागरी क्षेत्रावर पाच दशकांपासून नजर नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय नौदल 18 नोव्हेंबर 2026 रोजी दीर्घ पल्ल्याच्या सागरी टेहळणी (एलआरएमआर) मोहिमांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच
Indian Navy 50 Years Long Range Maritime Reconnaissance


Indian Navy 50 Years Long Range Maritime Reconnaissance


सुपर कॉन्स्टलेशनपासून पी-8आयपर्यंत, हिंदी महासागर आणि त्यापलीकडील सागरी क्षेत्रावर पाच दशकांपासून नजर

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय नौदल 18 नोव्हेंबर 2026 रोजी दीर्घ पल्ल्याच्या सागरी टेहळणी (एलआरएमआर) मोहिमांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा गौरव करत आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा भारतीय नौदलाच्या हवाई पथक क्रमांक 312 (आयएनएएस 312) या ‘अल्बाट्रॉस’ पथकाच्या सेवेत दाखल होण्याच्या 50व्या वर्धापन दिनाशीही जुळून आला आहे. भारताच्या सागरी सुरक्षेसाठी गेल्या पाच दशकांपासून हवाई मार्गाने सातत्याने सुरू असलेल्या टेहळणी कार्याचा हा गौरव आहे.

1971 च्या युद्धानंतर जहाजे आणि हेलिकॉप्टर यांच्या समन्वयाने कार्य करू शकणाऱ्या किनारपट्टीवर आधारित सागरी गस्ती विमानांची गरज निर्माण झाली. त्यामुळे नौदलाने दीर्घ पल्ल्याच्या सागरी टेहळणीची जबाबदारी स्वीकारली. 18 नोव्हेंबर 1976 रोजी गोव्यातील आयएनएस हंसा येथे आयएनएएस 312 हे पथक कार्यान्वित करण्यात आले. भारतीय हवाई दलाकडून हस्तांतरित करण्यात आलेली पाच लॉकहीड सुपर कॉन्स्टलेशन विमाने या पथकात समाविष्ट करण्यात आली.

1977 मध्ये इल्युशिन आयएल-38 विमानांचा समावेश झाल्यामुळे नौदलाची सागरी टेहळणी आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक बळकट झाली. 1988 मध्ये आयएनएएस 312 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या टुपोलेव्ह टीयू-142एम विमानांमुळे हिंदी महासागर क्षेत्रातील नौदलाच्या गस्तीची व्याप्ती वाढली. 2013 मध्ये अरक्कोनम येथील आयएनएस राजाली येथे बोईंग पी-8आय विमाने दाखल झाल्याने या क्षमतेत आणखी प्रगती झाली. या विमानांमुळे विस्तृत क्षेत्रातील गुप्तचर माहिती संकलन, टेहळणी आणि टोपण, पाणबुडीविरोधी युद्ध तसेच सागरी हल्ला करण्याच्या क्षमतांमध्ये वाढ झाली.

गेल्या पाच दशकांमध्ये नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांनी ऑपरेशन कॅक्टस, विजय, पराक्रम आणि सिंदूर यांसह चाचेगिरीविरोधी मोहिमा तसेच शोध आणि बचाव कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आज अरक्कोनम येथील आयएनएस राजाली येथे तैनात असलेल्या आयएनएएस 312 आणि गोव्यातील आयएनएस हंसा येथे तैनात असलेल्या आयएनएएस 316 या पथकांची पी-8आय विमाने हिंदी महासागर आणि त्यापलीकडील सागरी क्षेत्रावर सातत्याने नजर ठेवून भारताच्या सागरी हितांचे संरक्षण करत आहेत.

या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नौदलातील वैमानिक, मोहिमांमध्ये सहभागी असलेले कर्मचारी, देखभाल पथके आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या अनेक पिढ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. या सर्वांच्या समर्पण आणि व्यावसायिक कौशल्यामुळे गेल्या पाच दशकांमध्ये ही क्षमता विकसित झाली आणि टिकून राहिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande