
दुबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि इंग्लंडचा फलंदाज टॉम बॅंटन यांनी ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर जाहीर झालेल्या या क्रमवारीत, अर्शदीपने गोलंदाजांच्या यादीत १२ स्थानांची झेप घेत संयुक्त १९ वे स्थान पटकावले आहे.
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनेही १५ स्थानांची झेप घेत संयुक्त १२ वे स्थान पटकावले आहे. त्याचा सहकारी काईल जेमिसननेही १५ स्थानांची झेप घेत ४५ वे स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील शानदार शतकाचा इंग्लंडचा फलंदाज टॉम बॅंटनला मोठा फायदा झाला आहे. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बॅंटनने ९९ चेंडूंमध्ये १२१ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे शतक होते. या कामगिरीमुळे, बँटनने फलंदाजी क्रमवारीत ३४ स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान पटकावले आहे इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनेही क्रमवारीत प्रगती केली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर, त्याने दोन स्थानांची झेप घेत नववे स्थान पटकावले आणि अव्वल १० मध्ये पुनरागमन केले. भारतीय फलंदाज शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही एकदिवसीय गोलंदाजांच्या अव्वल १० मध्ये पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये बळी घेतल्यानंतर, त्याने चार स्थानांची झेप घेत सातवे स्थान पटकावले आहे.
एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी कसोटी क्रमवारीतही सुधारणा केली आहे. झिम्बाब्वेने शारजामध्ये दोन्ही संघांमधील कसोटी मालिका २-० ने जिंकली. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सर्वाधिक प्रगती करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्याने पाच स्थानांची झेप घेत संयुक्तपणे १६ वे स्थान पटकावले. दुसऱ्या कसोटीत सहा बळी घेत त्याने सामनावीर पुरस्कार जिंकला.
झिम्बाब्वेचा फिरकी गोलंदाज ग्रॅम क्रेमरही सहा स्थानांनी वर चढून ६५ व्या स्थानावर पोहोचला. फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत, झिम्बाब्वेचा सलामीवीर इनोसेंट काया ५० व्या स्थानावर पोहोचला. अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलर ६२ व्या स्थानावर पोहोचला.
अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू नासिर मारूफखिलने आपल्या कसोटी पदार्पणातच शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने पहिल्या डावात शतक झळकावले आणि सात बळी घेतले. पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात शतक आणि सात बळी घेणारा तो जगातील केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. या प्रभावी कामगिरीनंतर, नसीरने कसोटी फलंदाजी क्रमवारीत ९३ वे स्थान मिळवले, तर गोलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे ७८ व्या स्थानावर होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे