
वेलिंग्टन (न्यूझीलंड), 18 नोव्हेंबर (हिं.स.) । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघासमोर न्यूझीलंडमधील कसोटी विजयाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याचे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत करण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ आपल्याच भूमीवर इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत केल्यामुळे आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.
भारताने न्यूझीलंडमध्ये शेवटचा कसोटी सामना आणि मालिका २००९ मध्ये जिंकली होती. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, ज्यांनी १७ वर्षांपूर्वीच्या १-० अशा मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ते आता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या कठीण परिस्थितीत प्रशिक्षक म्हणून आपला पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
भारत आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ५१.५२ टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड ७२.२२ टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या मालिकेत विजय मिळवल्यास, विशेषतः 'क्लीन स्वीप' केल्यास, भारताच्या डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठण्याच्या आशा अधिक प्रबळ होऊ शकतात. पुढील वर्षी भारतात होणारी 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' ही भारतापुढील अंतिम मोठी आव्हानात्मक मालिका असेल. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठीही ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्यांना भविष्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि श्रीलंकेविरुद्ध कठीण आव्हानांचा सामना करायचा आहे.
भारतीय फलंदाजीच्या बाबतीत अनुभवाची मोठी कमतरता दिसून येते, कारण यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, ध्रुव जुरेल आणि साई सुदर्शन यांसारख्या भारताच्या कोणत्याही विशेष फलंदाजाने न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना खेळलेला नाही. केवळ ऋषभ पंतकडे येथे कसोटी खेळण्याचा काहीसा अनुभव आहे.
भारतीय संघाच्या अंतिम ११ क्रिकेटपटूंमधील वेगवान गोलंदाजांची निवड निर्णायक ठरेल. जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याला मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज यांची साथ मिळू शकते. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतो. संघात वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासारखे अष्टपैलू क्रिकेटपटूंचे पर्यायही आहेत. वेलिंग्टनमधील परिस्थिती पाहता, भारताने योग्य वेगवान गोलंदाजांची निवड केल्यास सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.
'बेसिन रिझर्व्ह' मैदानावर भारताची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. येथे खेळलेल्या आठ कसोटी सामन्यांपैकी भारताने केवळ एक सामना जिंकला आहे, पाच सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताचा एकमेव विजय १९६८ मध्ये मिळाला होता. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या अलीकडील सामन्यात भारताला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता; त्या सामन्यात भारताचा डाव दोन्ही डावांत २०० धावांच्या आत कोसळला होता आणि टिम साऊदीने एकूण नऊ बळी घेतले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे