सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ : बिहारने रंगतदार लढतीत दिल्लीचा दोन गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर, (हिं.स.) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ सामन्यात वैभव सूर्यवंशीशिवाय खेळताना बिहारने दिल्लीचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने बिहारसमोर २२५ धावांचे लक्ष्य ठेवले, जे त्यांनी एक चेंडू शिल्लक असताना पूर
वैभव सूर्यवंशी


नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर, (हिं.स.) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ सामन्यात वैभव सूर्यवंशीशिवाय खेळताना बिहारने दिल्लीचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने बिहारसमोर २२५ धावांचे लक्ष्य ठेवले, जे त्यांनी एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.

पहिल्या सामन्यात वैभवने बिहारचे कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, सूरज कश्यपच्या कर्णधारपदाखाली संघाने दिल्लीविरुद्ध एक रोमांचक सामना जिंकला. तीन सामन्यांमधील बिहारचा हा दुसरा विजय आहे.

बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रशांत सिंगने पहिल्याच षटकात प्रियांश आर्याची विकेट घेऊन संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर यश धुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. धुलने एका बाजूला भक्कमपणे फलंदाजी करत सार्थक रंजनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रंजन १८ धावा करून बाद झाला. धुलने नितीश राणासोबत तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. नितीश अवघ्या सात धावांवर बाद झाला. नितीश बाद झाल्यानंतर, धुलसोबत तेजस्वी दहिया सामील झाला.

धुल आणि दहियाने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी १२६ धावा जोडल्या. धुलने शानदार शतक झळकावले, तर दहियाने अर्धशतक केले. धुलने आपल्या खेळीत १६ चौकार आणि सात षटकार मारले. धुलने ५९ चेंडूंमध्ये १२५ धावा केल्या. दहियाने २५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तितक्याच षटकारांसह ५१ धावा केल्या. या दोन शानदार खेळींमुळे दिल्लीने २० षटकांत पाच गडी गमावून २२४ धावा केल्या. बिहारकडून रघुवेंद्र प्रताप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बिहारची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात आशिष कुमार अवघ्या ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर आयुष लोहारुका आणि बिपिन सौरभ यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी अवघ्या ३५ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावा जोडल्या. आयुषने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. दरम्यान, सौरभने तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १९ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. त्यांच्या खेळीने संघाच्या विजयाचा पाया रचला. आठव्या षटकात जेव्हा दोघेही बाद झाले, तेव्हा बिहारची धावसंख्या १२० च्या जवळ पोहोचली होती.यानंतर, बिहारच्या नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्या. पण, क्रिकेटपटूंच्या छोट्या खेळीने संघाचा विजय निश्चित केला. तरुण कुमारने १५ धावांचे, तर रघुवेंद्र प्रताप सिंगने २५ धावांचे योगदान दिले.

शिवाय, प्रशांत सिंगने ८ चेंडूंमध्ये नाबाद १३ धावा आणि मयंक कुमारने तीन षटकारांच्या मदतीने १३ चेंडूंमध्ये नाबाद २४ धावा करून, शेवटच्या षटकात एक चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. बिहारला शेवटच्या षटकात केवळ पाच धावांची गरज होती आणि प्रशांतने पाचव्या चेंडूवर चौकार मारून बिहारचा विजय निश्चित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande