
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)
अमरावती विभागाच्या डाक अधीक्षक कार्यालयाच्या वतीने डॉ. सालीम अली यांच्या जयंतीनिमित्ताने विशेष वीरूपण (खास चित्रमय टपाल मोहर) आणि पक्ष्यांवरील दोन पिक्चर पोस्टकार्ड जारी करण्यात आले. नागपूर येथे होणाऱ्या विदर्भ विभागीय टपाल तिकीट संग्रह प्रदर्शन नागपेक्स -२०२६ चे घोषवाक्य मुद्रा जारी करण्याचा कार्यक्रम अमरावती येथे अरण्यार्पण हॉल, समता कॉलनी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस डॉ. सुधीर जाखेरे यांची उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर होते. यावेळी व्यासपीठावर राम होलगरे, डॉ. गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे आयोजित पक्षी सप्ताहाच्या समारोपानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती डाक विभाग तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र संस्था येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी डाक विभागाचे रवींद्र रोतळे, विजय चव्हाण, वेक्सचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वऱ्हेकर, सहसचिव डॉ. मंजूषा वाठ, मानद वन्यजीव रक्षक सौरभ जवंजाळ यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्ज्वलन व डॉ. सालीम अली आणि पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. सर्वप्रथम डॉ. गजानन वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व महाराष्ट्र पक्षिमित्र संस्था व पक्षी सप्ताहाबाबत माहिती दिली. संचालन डॉ. मयूरी कथलकर यांनी केले. आभार ऑफीस असिस्टंट अमृता झळके यांनी मानले. यावेळी अमरावती येथील डाक तिकीट संग्राहक सतीश रानडे, नंदकिशोर पाबळे यांच्या पक्ष्यांवरील डाक तिकिटांचे प्रदर्शनसुद्धा लावण्यात आले होते. यावेळी डाक तिकीट संग्राहक सुशीलकुमार जैन, राजेंद्र जैन, पक्षिमित्र शिक्षिका दीपाली बाभूळकर, डॉ. अनिरुद्ध देशमुख, डॉ. नंदकिशोर बोंडे यांची उपस्थिती होती.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी