अमरावती - दिवाळीत मनमानी भाडे आकारणाऱ्या २६७ खासगी बसेसवर कारवाई
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचालकांकडून होणाऱ्या अवास्तव भाडेवाढीला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. दि. २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आ
दिवाळीत मनमानी भाडे आकारणाऱ्या २६७ खासगी बसेसवर कारवाई


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचालकांकडून होणाऱ्या अवास्तव भाडेवाढीला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. दि. २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत २६७ दोषी बसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत पथकाने तब्बल १ हजार २३५ बसेसची तपासणी केली. यात जादा भाडे आकारणाऱ्या ७२ बस, प्रवासी बसमधून मालवाहतूक करणाऱ्या ८१ बस, इतर गुन्हे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११४ बसेसवर कारवाई करण्यात आली. तसेच १६ लाख ८२ हजार २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सणासुदीच्या काळात खासगी प्रवासी बसेसना एसटी बसच्या भाडेदरापेक्षा ५० टक्के जास्त दराने भाडे आकारणी करण्याची मुभा आहे. मात्र, त्याहून अधिक दराने भाडे आकारल्यास प्रवाशांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बस ऑपरेटरने मनमानी भाडे आकारल्यास प्रवाशांनी rto.२७-mh@mah.gov.in किंवा mh२७@mahatranscom.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande