
सोलापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ऊसदराचा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यात यावा, यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन भवन येथे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेण्यात आले. ऊसदरासंदर्भातील दोन्ही बाजूंच्या भूमिका, अडचणी आणि अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ऊसदराच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही घटकावर अन्याय होऊ न देता चर्चेच्या माध्यमातून ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपून त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड