
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
विदर्भाची पुरातन राजधानी आणि श्री रुक्मिणी मातेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान श्री अंबा रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दीपोत्सव, मॅरेथॉन तसेच बोटिंग स्पर्धेची सुद्धा धूम राहणार आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, कृषी आणि क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी नरेंद्र महाराज पुरी, जोगेश्वर दास प्रभू यांच्या हस्ते महोत्सव कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा, यावेळेत एक लाख दिव्यांचा भव्य दीपोत्सव आणि महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता विदर्भाची जीवनवाहिनी असलेल्या वर्धा नदीच्या काठावर वरदायिनी आरती अर्थात वर्धा नदीची भव्य आरती करण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता कुऱ्हा ते कौंडण्यपूर या १० किलोमीटर अंतरावर राज्यस्तरीय ओपन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ पुरुषांसाठी आयोजित या स्पर्धेत एकूण ७१ हजार रुपयांची १६ आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याच दिवशी सकाळी १० वाजता श्री अंबिका देवी संस्थान येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विश्व मांगल्य सभा व होमहवन आयोजित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना आणि धार्मिक विधी या उपक्रमाचे वैशिष्ट्य राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत यात्रा परिसरातील प्रांगणात शेतकऱ्यांसाठी बैलगाडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन ते पाच, या वेळेत बोटिंग रेस हे महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. वर्धा नदीच्या परिसरात आयोजित या उपक्रमातून नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता पारंपरिक व शास्त्रीय नृत्यांसह भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ नोव्हेंबरला साडी अर्पण सोहळा
२३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेला वरदायिनी मातेला अर्थात वर्धा नदीला २२१ मीटर अखंड साडी अर्पण सोहळा पार पडणार आहे. या विशेष सोहळ्यास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विदर्भाची तहान भागविणाऱ्या वर्धा नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी