अमरावती - शहर कचराकुंडीत, कंत्राटदारांचे खिसे भरले?; स्वच्छता कंत्राटाची होणार चिरफाड
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिकेने प्रशासकीय राजवटीत दिलेल्या स्वच्छतेच्या कंत्राटात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात हा विषय विधान परिषदेत उपस
शहरातील स्वच्छता कंत्राटाचे पोस्टमार्टन होणार आयुक्त नयना गुंडे यांनी केली तीन सदस्यीय समिती गठित


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

महापालिकेने प्रशासकीय राजवटीत दिलेल्या स्वच्छतेच्या कंत्राटात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात हा विषय विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त सौम्या शर्मा यांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा संकलन व कचरा वहन, अशा दोन्ही कंत्राटाची निविदाप्रक्रिया झाली होती. हा कंत्राट सात वर्षांसाठी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सुमारे ३४० कोटी रुपयांना देण्यात आला होता. मात्र निविदेतील अटी व कंत्राटदारासोबत करण्यात आलेला करारनामा, यामध्ये तफावत असल्याचे व त्याचा थेट लाभ कंत्राटदारास पोहोचविण्यात आला, असे आरोप झालेत. हा मुद्दा विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे व संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात मांडून चौकशीची मागणी केली होती. विधान परिषद सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नावर मंत्री ना. उदय सामंत यांनी विभागीय चौकशी करण्यात येणार असून विभागीय आयुक्तांमार्फत ती करण्यात येणार असल्याचे उत्तर दिले होते. मात्र त्यानंतर विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश असलेले पत्र मंत्रालयातून आलेच नाहीत. आता हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित होण्याची शक्यता लक्षात घेता विभागीय आयुक्तांना मंत्रालयातून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी विभागीय चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीत नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस, लेखा विभागाचे सहायक आयुक्त ऋषीकेश वाघमारे व सहायक आयुक्त अनुप डुरे यांचा समावेश आहे. ही समिती स्वच्छता कंत्राटाची चौकशी करणार असून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, समितीने कामकाज प्रारंभ केले असून महापालिका प्रशासनाला कंत्राटासंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

मंत्रालयातून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार महापालिकेतील स्वच्छता कंत्राटाची विभागीय चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर तो शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

नयना गुंडे, विभागीय आयुक्त, अमरावती.

--

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande