घनकचऱ्याऐवजी पाडकामाचा मलबा सुकळी कंपोस्ट डेपोत; उपमहापौर भेंडे यांनी कंत्राटदाराचा ट्रक पकडला
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील घनकचरा वाहतुकीच्या कामात आता पाडकामाचा मलबाही वाहून नेला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कचऱ्याऐवजी बांधकामाचा मलबा सुकळी येथील कंपोस्ट डेपोत नेणारा कंत्राटदाराचा ट्रक उपमहापौर सचिन भेंडे यांनी रंगेहात पक
घनकचऱ्याऐवजी पाडकामाचा मलबा सुकळी कंपोस्ट डेपोत; उपमहापौर भेंडे यांनी कंत्राटदाराचा ट्रक पकडला


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

शहरातील घनकचरा वाहतुकीच्या कामात आता पाडकामाचा मलबाही वाहून नेला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कचऱ्याऐवजी बांधकामाचा मलबा सुकळी येथील कंपोस्ट डेपोत नेणारा कंत्राटदाराचा ट्रक उपमहापौर सचिन भेंडे यांनी रंगेहात पकडला. कचऱ्याचे वजन वाढवून देयक काढण्याचा हा प्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. साईनगर प्रभागात सकाळी हा प्रकार उघडकीस आला. उपमहापौर सचिन भेंडे यांनी साईनगर ते डीपीएस मार्गावरून कचरा वाहून नेणाऱ्या एका ट्रकची अचानक तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये बांधकाम पाडल्यानंतर निघालेला मलबा भरलेला आढळला. याबाबत ट्रकचालकाकडे विचारणा केली असता, हा मलबा सुकळी येथील महापालिकेच्या कंपोस्ट डेपोत नेण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. शहरातील कचरा वाहतुकीचा कंत्राट कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असून, संबंधित ट्रकही याच कंपनीचा असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातून दररोज सुमारे ३५० मेट्रिक टन कचरा वाहून नेला जात असल्याचा स्वच्छता विभागाचा दावा आहे. असे असतानाही शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. त्यातच कचऱ्याच्या नावाखाली मलबा वाहून नेऊन त्याचे वजन वाढवून दाखविणे आणि त्यानुसार देयक काढण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप उपमहापौर भेंडे यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकाराची माहिती उपमहापौरांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व स्वच्छता अधिकारी डॉ. पाठबागे यांना तातडीने दिली. तसेच ट्रकमधील मलब्याची छायाचित्रेही पाठविली आहेत. याप्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी होऊन संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande