

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) -
भारत-मलेशिया संयुक्त लष्करी सराव 'हरिमौ शक्ती' याची सहावी आवृत्ती आज मलेशियातील इपोह येथे सुरू झाली. हा सराव 19 ते 30 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित केला जात आहे.
उभय देशांच्या सैन्यांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी 120 जवान आहेत. 'हरिमौ शक्ती' हा सराव भारत आणि मलेशियामध्ये आलटून पालटून आयोजित केला जाणारा एक द्विपक्षीय लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या प्रकरण -सात अंतर्गत अप्रचलित (छुप्या) कारवायांच्या संचालनाचा संयुक्तपणे सराव करणे, हा या सरावाचा उद्देश आहे. यामधून दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान एकत्रितपणे समन्वय साधण्यावर विशेष भर दिला जाईल. हा सराव वनक्षेत्र आणि निम-शहरी प्रदेशातील समन्वित कारवायांवर लक्ष केंद्रित करेल. त्यामध्ये आंतरकार्यक्षमता आणि परिचालन परिणामकारकता वाढवण्यासाठी संयुक्त नियोजन, रणनैतिक समन्वय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या सरावाची सुरुवात, आंतर-प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यपद्धतींशी परिचय करून घेत होईल आणि हा सराव टप्प्याटप्प्याने पार पाडला जाईल. त्यानंतर संयुक्त सामरिक कवायती केल्या जातील. यातील प्रशिक्षण उपक्रमांमध्ये संयुक्त कमांड पोस्ट आणि निगराणी केंद्राची स्थापना, दहशतवादविरोधी कारवाया, छापे टाकणे, वेढा घालून शोधमोहीम जारी करणे तसेच लढाऊ अभियांत्रिकी कवायती यांचा समावेश असेल. टेहळणी आणि निगराणीसाठी मानवरहित हवाई प्रणालीच्या एकात्मिक वापरावर, तसेच शत्रूचे ड्रोन शोधून त्यांना निष्प्रभ करण्यासाठी मानवरहित- प्रति हवाई प्रणालीच्या क्षमतेवर विशेष भर दिला जाईल.
दहशतवादविरोधी परिस्थितीचा काल्पनिक प्रसंग तयार करून त्यात समन्वित जमिनीवरील कारवाया, एकात्मिक निगराणी आणि मानवरहित प्रणालींचा वापर समाविष्ट करत, एका संयुक्त पडताळणी सरावाने या सरावाची सांगता होईल.
'हरिमौ शक्ती' या सरावामुळे दोन्ही सैन्यांना डावपेच, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल, तसेच त्यांच्यातील आंतरकार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढेल. हा सराव भारत आणि मलेशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य आणि द्विपक्षीय लष्करी संबंध अधिक दृढ करेल. या लष्करी कार्यक्रमामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला हातभार लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी