
जळगाव, 19 नोव्हेंबर (हिं.स.)शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात तरुणाच्या घरासमोर पिस्तूलातून गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणात जळगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेशी संबंधित तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. केयूर पंधारे यांच्या घरासमोर हा गोळीबाराचा प्रकार घडला होता. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी मदत केल्याचा राग मनात धरून संशयितांनी केयूर यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. वादाचे रूपांतर पुढे दहशतीच्या प्रकारात झाले. संशयितांपैकी काहींनी पिस्तूलातून केयूर यांच्या घराच्या दिशेने गोळीबार केला, तर अन्य काही जणांनी तलवारी दाखवून परिसरात भीती निर्माण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची गंभीर दखल घेत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर