
नाशिक, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। हॉटेलमधील गल्ल्यात ठेवलेली १ लाख १४ हजार रुपयांची रोकड व ६० हजार रुपये किमतीच्या १५ स्कॉचच्या बाटल्या चोरून नेल्याप्रकरणी तीन संशयित स्वयंपाक्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन विठ्ठलसिंग राजपूत (रा. सम्राट ग्रुप, ध्रुवनगर, नाशिक) हे गंगापूर रोडवरील रिजवानी फार्म येथे असलेल्या रेस्टॉरंट अॅण्ड बारचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, की हॉटेलच्या मालकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी हॉटेलच्या काऊंटरमध्ये १ लाख १४ हजार रुपयांची रोकड ठेवली होती, तसेच ६०
हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या १५ स्कॉचच्या बाटल्याही तेथे होत्या. या हॉटेलमध्ये काम करणारे स्वयंपाकी कपिल भारत सिंग (वय २५), रूपेश बिश्वकर्मा (वय २२), वरुण भट्टा (वय २६) हे सर्व जण मूळचे नेपाळचे असून, सध्या ते कामाच्या ठिकाणीच राहतात. या तिघांनी संगनमत करून रोकड व स्कॉचच्या बाटल्या असा एकूण १ लाख ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI