
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर (हिं.स.) । घरकुल योजनेत घर मंजूर झाल्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ महिलेची दोन हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना मंडणगड तालुक्यात उघडकीस आली आहे. तहसीलदार कार्यालयातून आल्याचे भासवून एका अनोळखी व्यक्तीने ही फसवणूक केली. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नरेश सदानंद बैकर (वय ४५, रा. दुर्गवाडी, ता. मंडणगड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या आई कलावती सदानंद बैकर या घरी एकट्याच असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आली. आपण मंडणगड तहसीलदार कार्यालयातून आलो असून, तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे. त्यासाठी दोन हजार रुपये भरावे लागतील. तसेच फोटो आणि आधारकार्ड आवश्यक असल्याचे सांगून या व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन केला.
घरकुल मंजुरीच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडून दोन हजार रुपये रोख घेतले आणि फसवणूक केली. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी