
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून सध्या या प्रक्रियेबाबत विविध समाज माध्यमांहून अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर लाभार्थी महिलांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी स्पष्ट केले आहे.राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे.या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यास शासनामार्फत अधिकृत शासन निर्णयानुसार (जीआर) त्याची माहिती दिली जाईल. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीच्या सांगण्यावर किंवा भुलथापांना बळी पडू नये असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या कामासाठी कोणाकडेही पैशांची मागणी होत असल्यास कोणालाही पैसे देऊ नयेत आणि आपली आर्थिक फसवणूक टाळावी, असे कळविण्यात आले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी