चाकण औद्योगिक क्षेत्रातील पूरस्थिती नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अतिक्रमणे ३१ डिसेंबरपर्यंत हटविण्याचे आदेश पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर पुणे, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : चाकण औद्योगिक क्षेत्रातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नदी, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणे हटविण्यासह पायाभ
Dudi


अतिक्रमणे ३१ डिसेंबरपर्यंत हटविण्याचे आदेश

पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर

पुणे, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : चाकण औद्योगिक क्षेत्रातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नदी, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणे हटविण्यासह पायाभूत सुविधांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रातील नदी, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणांची माहिती संबंधित यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार सादर करावी. जलसंपदा विभाग आणि तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचे योग्य नियोजन करावे. अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करून ती ३१ डिसेंबरपर्यंत हटविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. तसेच प्रमुख नाले आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाह मार्गांचा तांत्रिक आढावा घेऊन १५ दिवसांत आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यासही त्यांनी सांगितले.

पुणे-नाशिक महामार्गावरील रुंदीकरण आणि यू-टर्न जंक्शनच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी समन्वयाने काम करावे. तळेगाव फेज-५ ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० या जोडरस्त्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून मनुष्यबळ वाढवावे. कामाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी एमएसएफचे सुरक्षा रक्षक वाहतूक पोलिसांना सहकार्य करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन 'ओरिजिन-डेस्टिनेशन' सर्वेक्षण करण्यात यावे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार एमआयडीसी, औद्योगिक संघटना आणि पीएमपीएमएल यांनी सार्वजनिक बससेवेचे नियोजन करावे. कारखान्यांच्या प्रमुखांसमवेत लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांबाबत स्वतंत्र बैठका घेऊन सार्वजनिक सुविधा, सीएसआरअंतर्गत कामे, परिसराचे सुशोभीकरण आणि अनधिकृत पार्किंगच्या समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय रस्ते आणि पावसाळी गटारांच्या कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करून संबंधित विभागांनी आवश्यक सुधारणा कराव्यात. जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आवश्यक कार्यवाही करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यापुढील बैठकांना उपस्थित राहून प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्देशित केले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील पूरस्थिती, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, प्रदूषण आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर समन्वयाने कार्यवाही करून निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande