लातूरच्या रंगकर्मींचा गौरव; ३५ युवा कलाकारांचा सन्मान
लातूर, २ नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राच्या नाट्यविश्वात लातूरच्या रंगकर्मींकडून यंदा उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. विविध राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा आणि आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवांमध्ये लातूरच्या कलाकारांनी पारितोषिकांची कमाई करत शहराच्या
सत्कार सोहळा


लातूर, २ नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राच्या नाट्यविश्वात लातूरच्या रंगकर्मींकडून यंदा उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. विविध राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा आणि आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवांमध्ये लातूरच्या कलाकारांनी पारितोषिकांची कमाई करत शहराच्या नाट्यवैभवात भर घातली आहे. या यशस्वी कलाकारांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जयक्रांती महाविद्यालयात नुकताच विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी एकूण ३५ युवा कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणे येथे संपन्न झालेल्या स्व. भक्ती बर्वे इनामदार करंडक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत सात पारितोषिके पटकावणाऱ्या लातूरच्या ‘टू इज कंपनी’ या नाटकाच्या संपूर्ण टीमचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच नांदेड येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात नाट्यकला प्रकारात पारितोषिके मिळविणाऱ्या युवा कलाकारांचाही सन्मान करण्यात आला.

लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी, माजी विद्यार्थी संघटना जयक्रांती अध्यापक महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नागनाथजी गित्ते, लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचे अध्यक्ष तथा उद्योजक अनिलजी झंवर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, संयोजक अनिल पुरी, जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत घार, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले आणि प्रा. दीपक वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध नाट्यस्पर्धांमध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि सांघिक कलागुणांच्या माध्यमातून लातूरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ३५ कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कलाकारांच्या मेहनतीचे आणि यशाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना लातूरची रंगभूमी अधिक प्रगल्भ होण्यासाठी कर्तृत्ववान रंगकर्मींचे कौतुक होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. घरातील माणसांकडून मिळणारे कौतुक कलाकारांना जगाच्या रंगभूमीवर आत्मविश्वासाने उभे राहण्याचे बळ देते. आपल्या पाल्यांच्या यशाचा गौरव होताना पालक आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच या सोहळ्याची खरी फलश्रुती ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अनिल पुरी यांनी केले. बालाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. दीपक वेदपाठक यांनी आभार मानले. आयोजनासाठी रणजित आचार्य, योगीराज पुणेकर आणि विशाल वाटवडे यांनी विशेष सहकार्य केले.या कौतुक सोहळ्याला नाट्य क्षेत्रातील कलाकार, रंगकर्मी, पालक आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande