
सोलापूर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।
पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि गावातील पाणीपुरवठ्याचे स्रोत सक्षम करण्याच्या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), सोलापूर कार्यालय आणि सापटणे (टें.), ता. माढा येथील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा उभारणीचा श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून जलसंवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व तसेच इतरांसमोर एक आदर्श सापटणे ग्रामस्थांनी ठेवला आहे, अशी माहिती भोजनचे वरिष्ठ भू वैज्ञानिक डॉ. मुस्ताक शेख यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्याला पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि पाणीटंचाईच्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याचे स्थानिक पातळीवर संचयन करून भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सापटणे येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.
उपक्रमांतर्गत सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू व माती भरून त्यांची योग्य रचनेत मांडणी करत वनराई बंधारा बांधण्यात आला. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात प्रभावी जलसंधारणाची कामे करता येतात, हे या उपक्रमातून दाखवून देण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून जलसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड