सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत माजी संचालकांचे अर्ज राखीव
सोसायटी मतदारसंघातील ८८ अन्वये २३२ कोटींची जबाबदारी निश्चित अनेक दिग्गज नेत्यांच्या अर्जांवर हरकती सोलापूर, २ नोव्हेंबर (हिं.स.) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
DCC


सोसायटी मतदारसंघातील ८८ अन्वये २३२ कोटींची जबाबदारी निश्चित

अनेक दिग्गज नेत्यांच्या अर्जांवर हरकती

सोलापूर, २ नोव्हेंबर (हिं.स.) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी सुरू असून, अनेक दिग्गज नेत्यांचे अर्ज सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

सोसायटी मतदारसंघात ८८ अन्वये २३२ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच ११० अ नुसार बँकेच्या संचालक मंडळ समितीचे सदस्य असल्याच्या कारणावरून माजी संचालकांचे अर्ज राखून ठेवण्यात आले आहेत.

या निवडणुकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, जयवंत जगताप, दिलीप माने, प्रशांत परिचारक, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल आणि बबनराव अवताडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या सर्वांच्या अर्जांवर पुढील सुनावणी होणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदाच्या निवडणुकीत जबाबदारी निश्चित झालेल्या अनेक नेत्यांनी आपल्या पुढील पिढीला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. यामध्ये पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, शंभूराजे जगताप, बाळराजे पाटील, प्रणव परिचारक, सिद्धेश्वर अवताडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, यशवंत शिंदे आणि रणजित शिंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, रणजितसिंह शिंदे यांच्या सोसायटी मतदारसंघातील अर्जावर नागनाथ कदम यांनी हरकत घेतली आहे.

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून माजी मंत्री तथा माजी संचालक सिद्धाराम म्हेत्रे यांनी अर्ज दाखल केला आहे. ते मागील संचालक मंडळात होते तसेच बरखास्त समितीचे सदस्य असल्याने ११० अ अन्वये त्यांचा अर्जही छाननीदरम्यान राखून ठेवण्यात आला आहे.

माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी अनुसूचित जाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या अर्जावर तीन हरकती दाखल झाल्या आहेत. तसेच माळशिरस सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या बाबाराजे देशमुख यांच्या अर्जावरही हरकत घेण्यात आली आहे.

अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान सहकार क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. आता राखीव ठेवण्यात आलेल्या अर्जांवरील सुनावणीनंतर कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाला निवडणुकीतून माघार घ्यावी लागते, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande