
छत्रपती संभाजीनगर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी एफडीएने सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील ऑइल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केलीय. यावेळी तब्बल ४ लाख ८७ हजार रुपये किमतीचा २ हजार ७१० किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी केलेल्या आकस्मिक तपासणीत या उद्योगात अन्नसुरक्षेच्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. विशेष म्हणजे, एकूण ८६ गुणांपैकी या कंपनीला केवळ ३० गुण म्हणजेच ३५ टक्के गुण मिळाले. परवान्यावर जनरल मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन व्यवसायाची नोंद असताना प्रत्यक्षात केवळ तेलाचे रिपॅकिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या प्रयोगशाळा चाचण्यांचे अहवाल उपलब्ध नव्हते. पॅकिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्रही नव्हते.
याशिवाय कामाच्या ठिकाणी पुरेसे वायुवीजन, खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक संरक्षणात्मक साहित्याचा अभाव आढळला. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, यंत्रांची देखभाल, उत्पादन प्रक्रियेतील वेळ आणि तापमान नियंत्रण तसेच अन्नपदार्थ परत मागवण्याच्या योजनेच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या.
या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी कंपनीचा FSSAI अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला. निलंबन काळात कंपनीला उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. सर्व त्रुटींची पूर्तता करून त्याचे पुरावे सादर केल्यानंतरच फेरतपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच परवाना निलंबनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या खाद्यतेल व्यावसायिकांमध्ये FDA च्या या कारवाईमुळे खळबळ उडाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis