
सना, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।येमेनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. हुती बंडखोरांच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने लाल समुद्राजवळील हुदैदा प्रांतातील प्रमुख बंदर आणि तेल सुविधा केंद्राला लक्ष्य करत हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एकूण सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.हुतींच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अनीस अल-अस्बाही यांनी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रास ईसा बंदरावर झालेल्या हल्ल्यांमध्ये चार नागरिक जखमी झाले आहेत. हुतींचे दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या बंदरावरील एका धक्क्याला (जेट्टी) आणि व्यापारी जहाजालाही लक्ष्य करण्यात आले. याशिवाय, बजील जिल्ह्यात दुसरा मोठा हल्ला करण्यात आला. येथील तेल सुविधा केंद्रावर झालेल्या हल्ल्यात आणखी तीन जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या हुती गटाने सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीवर जोरदार टीका केली आहे. प्रवक्ते अनीस अल-अस्बाही यांनी सांगितले की, तेल साठे आणि महत्त्वाच्या बंदरांवर वारंवार केले जाणारे हल्ले हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उघड उल्लंघन आहे. येमेनमधील नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या युद्धगुन्ह्यांच्या मालिकेत या हल्ल्यांची आणखी भर पडली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, जगातील सर्वांत गरीब देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या येमेनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भीषण गृहयुद्ध सुरू आहे. एका बाजूला इराणसमर्थित हुती बंडखोर आहेत, तर दुसऱ्या बाजूला येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा देणारी सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी आहे. या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशाला सातत्याने हिंसाचार आणि विध्वंसाचा सामना करावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode