रामलीला रॅलीत गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेसने एआय निर्मित फोटोंचा घेतला आधार; किरेन रिजिजूंचा आरोप
नवी दिल्ली , 02 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधी पक्षांच्या ''इंडिया'' आघाडीच्या रॅलीत मोठी गर्दी दाखवण्यासाठी विरोधी पक्षाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध
रामलीला रॅलीत गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेसने एआय निर्मित फोटोंचा घेतला आधार; किरेन रिजिजूंचा आरोप


नवी दिल्ली , 02 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीच्या रॅलीत मोठी गर्दी दाखवण्यासाठी विरोधी पक्षाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार केलेल्या बनावट छायाचित्रांचा आधार घेतल्याचा आरोप केला आहे. रॅलींमधील गर्दी दर्शवण्यासाठी काँग्रेस आता एआय-निर्मित प्रतिमांवर अवलंबून राहू लागली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर तेलंगणातील काँग्रेस खासदार वामसी गड्डम आणि अन्य नेत्यांनी शेअर केलेले एक छायाचित्र पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला. रामलीला मैदान पूर्णपणे गर्दीने भरलेले दाखवण्यासाठी काँग्रेसच्या बनावट कथानक पसरवणाऱ्या पथकाला एआयच्या मदतीने तयार केलेले बनावट छायाचित्रही व्यवस्थित बनवता आले नाही, असा टोला रिजिजू यांनी लगावला.

काँग्रेसच्या अनेक समर्थकांसह माजी खासदार आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य जगदीश ठाकोर यांनीही हे छायाचित्र त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केले होते. मात्र, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या छायाचित्रातील कथित फेरफार तातडीने निदर्शनास आणून दिले. छायाचित्रातील व्यासपीठावर दिसणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे चेहरे तसेच रॅलीचे मूळ व्यासपीठ प्रत्यक्ष छायाचित्रांपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, भाजपने रविवारी झालेल्या या रॅलीला पूर्णपणे फ्लॉप शो संबोधले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर रिकाम्या खुर्च्यांचे छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करत मैदानाचा किमान ४० टक्के भाग रिकामा असल्याचा दावा केला. भाजपचे प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांनी सांगितले की, रॅलीपूर्वी काँग्रेसने १० लाख लोक जमणार असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात मैदानाचा ४० टक्के भाग रिकामा होता.

राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना पात्रा म्हणाले की, रॅलीतील गर्दी केवळ छायाचित्रणातील क्लृप्त्यांचा परिणाम आहे. अशा क्लृप्त्यांच्या जोरावर कोणालाही पंतप्रधान होता येणार नाही. दुसरीकडे, भाजपचे आरोप फेटाळून लावण्यासाठी काँग्रेसने रॅलीस्थळाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली. या आंदोलनात लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande