

सायडोंगरमधील वृक्षतोडीचा दर्शवला विरोध
रायगड, २ नोव्हेंबर (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथे प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुकारलेल्या कर्जत बंदला सोमवारी व्यापारी, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून प्रतिसाद मिळाला. कर्जतसह नेरळ, माथेरान, कळंब आणि कडाव परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणाची हानी होण्याची तसेच स्थानिक शेतकरी, आदिवासी आणि नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या भावना आणि पर्यावरणाचा विचार करून शासनाने या प्रकल्पाबाबत फेरविचार करावा आणि सायडोंगर येथून हा प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत बचाव समितीच्या प्रतिनिधींनी अॅड. मोरे यांच्यासह प्रस्तावित प्रकल्पस्थळाची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. प्रकल्पाला विरोध दर्शविणारे निवेदन तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच प्रस्तावित प्रकल्प सायडोंगर येथून अन्यत्र हलविण्याची मागणी करण्यात आली.
पर्यावरणपूरक उद्योग उभारण्याचा पर्याय
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रतिनिधी विजय मांडे यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांऐवजी प्रदूषणमुक्त माहिती-तंत्रज्ञान पार्क किंवा अन्य तंत्रज्ञानाधारित उद्योग उभारण्याचा पर्याय सुचविला. अशा उद्योगांमुळे परिसरातील सुशिक्षित स्थानिक तरुणांना आपल्या भागातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
सायडोंगर येथील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून कर्जत तालुक्यात विरोध वाढत असून, विविध राजकीय पक्ष, व्यापारी आणि सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाबाबत शासन काय भूमिका घेणार आणि स्थानिकांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार, याकडे कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)