दिवाळीत ‘खासगी बस’कडून प्रवाशांची लूट! तपासणीसाठी RTO ची विशेष मोहीम
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीच्या काळात मनमानी पद्धतीने भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. खासगी बसचे भाडे महाराष्ट्र राज्य
rto


पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)

दिवाळीच्या काळात मनमानी पद्धतीने भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

खासगी बसचे भाडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा, म्हणजे दीडपट अधिक आकारता येत नाही. मात्र, सणासुदीच्या काळात जादा भाडे आकारल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी जातात. या कालावधीत मात्र खासगी बसचालक-मालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारून प्रवाशांना वेठीस धरले जाते.

या पार्श्वभूमीवर खासगी बसच्या तपासणीसाठी रस्ता सुरक्षा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून स्वारगेट, वाघेश्वर पार्किंग, हडपसर, बालेवाडी व मुंबई हायवे, येरवडा, चंदननगर, सातारा रोड, संगमवाडी पार्किंग, वाकडेवाडी इत्यादी परिसरात तपासणी सुरू आहे. दोषी आढळलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, काही वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, जादा भाडे आकारणी किंवा प्रवासात अडचण आल्यास प्रवाशांनी नाव, मोबाइल क्रमांक आणि तिकिटाच्या छायाचित्रासह ८२७५३३०१०१ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच, बसमालक आणि चालकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन ‘आरटीओ’कडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande