उत्तर प्रदेशमध्ये व्हॅनची ट्रेलरला धडक; सात जणांचा मृत्यू, दोघे गंभीर
लखनौ, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातामुळे अनेक कुटुंबांतील आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले. हाटा कोतवाली क्षेत्रातील हाटा-पिपराइच मार्गावर थरुआडीहजवळ पेट्रोल पंपाच्या परिसरात ओम
UP KUSHINAGAR ROAD ACCIDENT 7 DEAD 2 CRITICAL


लखनौ, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातामुळे अनेक कुटुंबांतील आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले. हाटा कोतवाली क्षेत्रातील हाटा-पिपराइच मार्गावर थरुआडीहजवळ पेट्रोल पंपाच्या परिसरात ओमनी व्हॅन आणि ट्रेलर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी कुशीनगरमधील रस्ते अपघाताची दखल घेत मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग देण्याचे निर्देश दिले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भलुही गावातील रहिवासी आणि ग्रामप्रधानांचे प्रतिनिधी कन्हैया प्रसाद हे आपल्या कुटुंबीयांसह आणि परिचितांसोबत देवराज पिपरा येथे एका नातेवाइकाच्या घरी आयोजित तिलक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. हा मंगलमय कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण रात्री उशिरा ओमनी व्हॅनमधून आपल्या घरी परतत होते. त्याच वेळी हाटा कोतवाली क्षेत्रातील थरुआडीहजवळ समोरून येणाऱ्या ट्रेलरची व्हॅनला जोरदार धडक बसली.

धडक इतकी जोरदार होती की व्हॅन पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आणि त्यामध्ये प्रवास करणारे लोक आतमध्ये अडकले. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर व्हॅनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

या अपघातात कन्हैया प्रसाद, त्यांचे वडील रामबेलास, राम मिलन आणि आयुष यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची बातमी भलुही गावात पोहोचताच एकच आक्रोश झाला. ज्या कुटुंबात मंगलमय कार्यक्रमामुळे आनंदाचे वातावरण होते, त्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. जखमींना पुढील उपचारांसाठी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande