
त्बिलिसी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।
गॅस स्फोटामुळे जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथे गुरुवारी पाच मजली निवासी इमारतीचा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत एका बालकासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला.हा स्फोट गुरुवारी सकाळी उपनगरातील पोनिचाला परिसरात झाला. त्यामुळे अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली दबले गेले.
जॉर्जियाचे गृहमंत्री सुल्खान तमाझाशविली यांनी सांगितले की, बचाव पथकांनी एका लहान मुलासह सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अनेक तास दबून राहिल्यानंतरही तीन वर्षांच्या एका चिमुरडीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. जॉर्जियाच्या सार्वजनिक प्रसारक टीव्हीच्या वृत्तानुसार, तिला इंगोरोक्वा विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत आढळली नाही. ११ वर्षांच्या एका मुलावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती बऱ्यापैकी स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
वृत्तानुसार, आपत्कालीन व्यवस्थापन सेवेचे प्रमुख तेइमुराझ मगेब्रिशविली यांनी सांगितले की, मृत आढळलेल्या महिलांपैकी एक महिला त्या चिमुरडीची आई असल्याची शक्यता आहे.गॅस पुरवठादार ‘त्बिलिसी एनर्जी’ने सांगितले की, स्फोटाचे संभाव्य केंद्र मानल्या जाणाऱ्या सदनिकेची नोंद रिकामी होती. गेल्या वर्षभरात त्या सदनिकेत गॅसचा वापर झालेला नव्हता. तसेच, कंपनीला अद्याप दुर्घटनाग्रस्त ठिकाणाची पाहणी करता आलेली नाही.
जॉर्जियाच्या वृत्तसंस्थेनुसार, इमारतीच्या संरचनेची पाहणी केल्यानंतर त्बिलिसीचे महापौर काखा कालाद्जे यांनी सांगितले की, २८ कुटुंबांतील १०० हून अधिक नागरिकांना तात्पुरते हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. इमारतीच्या दोन भागांना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.
अभियोजक लेवन वेपखवाद्जे यांनी सांगितले की, सुरक्षा नियमांचे संभाव्य उल्लंघन झाल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी फौजदारी तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode