गावाच्या पाण्यासाठी रक्त सांडले; पण हुतात्म्याच्या घरासमोरील विहीरच दूषित !
नक्षली दहशतीविरोधात विकासासाठी लढणाऱ्या पत्रू दुर्गे यांची २०१५ मध्ये निर्घृण हत्या दशक उलटूनही कुटुंब गावाबाहेर, घर ओसाड अन् पाण्याचे स्वप्न अपूर्ण दामरंचा (गडचिरोली), २१ नोव्हेंबर : गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे आणि गावाचा विकास व्हाव
गडचिरोलीच्या दामरंचा गावातील पत्रु दुर्गे यांचे ओसाड घर


नक्षली दहशतीविरोधात विकासासाठी लढणाऱ्या पत्रू दुर्गे यांची २०१५ मध्ये निर्घृण हत्या दशक उलटूनही कुटुंब गावाबाहेर, घर ओसाड अन् पाण्याचे स्वप्न अपूर्ण

दामरंचा (गडचिरोली), २१ नोव्हेंबर : गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे आणि गावाचा विकास व्हावा, यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या दामरंचाचे तत्कालीन उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे यांची १९ एप्रिल २०१५ रोजी नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली. गावाच्या विकासासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या दुर्गे यांच्या बलिदानाला दशकाहून अधिक काळ लोटला; मात्र आज त्यांचे घर ओसाड असून, घरासमोरील विहिरीतील पाणीही वापरण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्या बलिदानानंतरही विकासाचे आणि सुरक्षिततेचे प्रश्न कायम असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

गावातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचावे, शेती समृद्ध व्हावी आणि गावाच्या विकासाला गती मिळावी, या ध्यासाने एका लोकप्रतिनिधीने थेट मंत्रालयापर्यंत धाव घेतली. इंद्रावती आणि बांडिया नद्यांच्या संगमावर उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी त्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, विकासाचा हाच प्रयत्न नक्षलवाद्यांच्या डोळ्यांत खुपला आणि त्याची किंमत त्यांना स्वतःच्या प्राणांनी मोजावी लागली. १९ एप्रिल २०१५ च्या मध्यरात्री कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे दुर्दैवी वास्तव आहे अहेरी तालुक्यातील दामरंचाचे तत्कालीन उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे यांच्या आयुष्याचे. गावाच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या लोकप्रतिनिधीचे बलिदान होऊन दशकाहून अधिक काळ लोटला; मात्र आज त्यांच्या घरासमोरील विहिरीत कचरा आणि गाळ साचला असून, पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचा फलक ग्रामपंचायतीने लावला आहे. दुसरीकडे, त्यांचे घर ओसाड पडले असून कुटुंबालाही गावात पूर्वीप्रमाणे स्थिरस्थावर होता आलेले नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पत्रू दुर्गे यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण झाले का आणि त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने सुरक्षिततेचा आधार मिळाला का, असे अस्वस्थ करणारे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

मंत्रालयाचे उंबरठे झिजवले; विकासासाठी घेतला होता ध्यास

पत्रू बालाजी दुर्गे हे केवळ दामरंचाचे उपसरपंच नव्हते, तर परिसरातील शेतकरी आणि गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व होते. दामरंचा आणि परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, शेतीला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी इंद्रावती आणि बांडिया नद्यांच्या संगमावर उपसा सिंचन प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला होता. या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी त्यांनी अनेकदा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. मुंबईतील मंत्रालयातही जाऊन त्यांनी पाठपुरावा केला. गावात विकासकामे व्हावीत आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे, हीच त्यांची भूमिका होती.

मात्र, नक्षलवाद्यांच्या विरोधाला न जुमानता विकासकामांसाठी पुढाकार घेणारे पत्रू दुर्गे त्यांच्या निशाण्यावर आले. १९ एप्रिल २०१५ च्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी दामरंचा येथे प्रवेश करून कुटुंबीयांसमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर परिसरात विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केले.

आर्थिक मदत आणि नोकरी मिळाली; पण कुटुंबाचे पुनर्वसन अपूर्णच

पत्रू दुर्गे यांच्या हत्येनंतर तत्कालीन सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. तसेच त्यांच्या मुलाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले. त्यामुळे कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला. मात्र, आर्थिक मदत आणि नोकरी म्हणजे संपूर्ण पुनर्वसन नव्हे, हे आज त्यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीवरून स्पष्ट होते.

पत्रू दुर्गे यांचा मुलगा नोकरीनिमित्त जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथे वास्तव्यास आहे. तर त्यांच्या पत्नीला शेतीच्या कामासाठी दामरंचा येथे ये-जा करावी लागते. मात्र, पत्रू दुर्गे यांचे घर आजही ओसाड पडले आहे. हत्येनंतर निर्माण झालेली भीती, असुरक्षिततेची भावना आणि विस्कटलेले कौटुंबिक जीवन यांचे परिणाम आजही या कुटुंबाच्या वास्तव्यातून जाणवतात. शासनाकडून मदत मिळाली असली, तरी कुटुंबाला गावात सुरक्षिततेच्या विश्वासासह स्थिर जीवन जगता आले का, हा प्रश्न कायम आहे.

ज्या पाण्यासाठी संघर्ष केला, त्याच विहिरीची दयनीय अवस्था

या संपूर्ण घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे पत्रू दुर्गे यांच्या घरासमोरील विहिरीची अवस्था. गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या या लोकप्रतिनिधीच्या घरासमोरील विहिरीत आज मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचला आहे. विहिरीतील पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचा फलक ग्रामपंचायतीने लावला आहे.

एका बाजूला गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी शासनदरबारी संघर्ष करणारे पत्रू दुर्गे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या घरासमोरील विहिरीची झालेली दुरवस्था, हा विरोधाभास मन सुन्न करणारा आहे. त्यांच्या बलिदानाला दशकाहून अधिक काळ लोटला, तरी पाणी आणि विकासाच्या प्रश्नांवर त्यांचे स्वप्न कितपत साकार झाले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

नक्षली दहशत संपली; मात्र मनातील भीती कायम

आज गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरोधातील लढ्याला महत्त्वाचे यश मिळत असताना, नक्षली हिंसेचा फटका बसलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे. बंदुकींचा आवाज थांबणे ही शांततेच्या दिशेने मोठी पायरी असली, तरी हिंसेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मनातील भीती संपवणे आणि त्यांना पुन्हा गावाशी जोडणे हेही तितकेच आवश्यक आहे.पत्रू दुर्गे यांच्या कुटुंबाची परिस्थिती या वास्तवाकडे लक्ष वेधते. विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबांना सुरक्षिततेची हमी, सन्मानाने जगण्याची संधी आणि गावात पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी आवश्यक आधार मिळणे गरजेचे आहे. केवळ आर्थिक मदत किंवा शासकीय नोकरी देऊन पुनर्वसनाची जबाबदारी पूर्ण होत नाही, तर सामाजिक आणि मानसिक सुरक्षिततेचे वातावरणही निर्माण करावे लागते.

बलिदानाला खरा न्याय विकासातूनच!

पत्रू बालाजी दुर्गे यांनी पाहिलेले स्वप्न केवळ एका सिंचन प्रकल्पापुरते मर्यादित नव्हते, तर गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचे होते. त्यांच्या हत्येने एका कुटुंबाचा कर्ता गमावला, तर गावाने विकासासाठी झटणारे नेतृत्व गमावले. आज त्यांच्या घराचे ओसाडपण, विहिरीची दुरवस्था आणि कुटुंबाचे गावाबाहेरील वास्तव्य ही केवळ एका व्यक्तीच्या बलिदानाची आठवण नाही, तर नक्षली हिंसेनंतरच्या पुनर्वसनातील आव्हानांचीही जाणीव करून देणारी परिस्थिती आहे.जंगलातून नक्षली दहशतीचा प्रभाव कमी होणे महत्त्वाचे आहेच; परंतु त्या दहशतीने माणसांच्या मनावर उमटवलेल्या जखमा भरून काढणे अधिक महत्त्वाचे आहे. पत्रू दुर्गे यांच्या कुटुंबाला सुरक्षिततेचा विश्वास मिळावा, त्यांच्या गावातील विकासकामांना गती मिळावी आणि त्यांनी पाहिलेल्या सिंचनाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हीच त्यांच्या बलिदानाला खरी आदरांजली ठरेल.

---------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande