गोशाळांच्या जमिनीचे व्यवहार आता कृषी दरानेच
• गोशाळेसाठी जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दरावर बंदी महसूल विभागाचे परिपत्रक जारी मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना आता कृषी दर लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्
गोशाळा


• गोशाळेसाठी जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दरावर बंदी

महसूल विभागाचे परिपत्रक जारी

मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना आता कृषी दर लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले.

गोशाळेतून सेवाभाव जपला जातो असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भटक्या, आजारी, वृद्ध, अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन होते. देशी गोवंशाच्या जतनासह चारा लागवड होत असल्याने गोशाळा व्यावसायिक दरातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्पष्टता नसल्याने जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरारावेळी या संस्थांना व्यावसायिक कंपनी समजून निवासी किंवा औद्योगिक दराने मूल्यांकन केले जात होते.

अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील 'वर्धमान गोतिर्थ' संस्थेच्या जमीन खरेदीच्यानिमित्ताने ही बाब समोर आली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्र्यांकडे निवेदन दिले होते.

गोशाळांसाठी २५ लाखांचे अनुदान

गोशाळांना चारा लागवड व जनावरांच्या संगोपनाचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि शाश्वत व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकृत गोशाळांना २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि कॅबिनेट उपसमिती राज्यातील प्रत्येक गोशाळा मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande