

- तब्बल २५ एकर शेती, घरदार असूनही मायभूमीत परतण्याचे धाडस नाही
- पोलीस संरक्षणात अहेरीत जगतेय साईनाथचे कुटुंब
अहेरी (गडचिरोली 22 नोव्हेंबर (हिं.स.) | नक्षलवादाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असले, तरी नक्षली हिंसाचाराच्या जखमा अद्याप भरलेल्या नाहीत. स्वतःची २५ एकर शेती, घरदार असूनही एका कुटुंबाला आजही मायभूमीत परतण्याचे धाडस होत नाही. तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या साईनाथ नरोटीच्या कुटुंबावर आजही भीतीच्या सावटाखाली जगण्याची वेळ आली आहे. शासनाची आर्थिक मदत मिळाली, आरोपींवर कारवाईही झाली; मात्र कुटुंबाच्या मनातील दहशत कायम आहे. अहेरीत पोलिसांच्या संरक्षणात जगणाऱ्या या कुटुंबाची व्यथा नक्षलमुक्तीच्या घोषणांपलीकडे नक्षलपीडितांच्या पुनर्वसनाचे वास्तव अधोरेखित करणारी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मर्दहूर हे साईनाथ नरोटी यांचे मूळ गाव. साईनाथ गडचिरोली शहरात राहून बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहत होता. पोलीस भरती प्रक्रियेतही त्याने सहभाग घेतला होता. हिंसाचाराच्या सावटाखालील भागातून बाहेर पडून शिक्षण, नोकरी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा त्याचा प्रयत्न होता. होळी सणानिमित्त तो आपल्या मर्दहूर या गावी आला होता. मात्र, मुख्य प्रवाहात येण्याचा त्याचा हाच प्रयत्न नक्षलवाद्यांच्या रोषाचे कारण ठरला.
नक्षलवाद्यांनी ९ मार्च २०२३ च्या रात्री साईनाथला घरातून उचलून नेले आणि गोळ्या झाडून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे, त्याच्याच गावातील नक्षलवादी प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे याचा या हत्येत सहभाग होता. एका तरुणाने पोलीस भरतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची शिक्षा त्याला मृत्यूच्या रूपाने देण्यात आली. ज्या वयात साईनाथने कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करायला हवी होती, त्याच वयात त्याची जीवनयात्रा संपविण्यात आली.
आरोपींवर कारवाई; मात्र कुटुंबाच्या आयुष्याचे काय ?
साईनाथच्या हत्येनंतर गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाने (सी-६०) या प्रकरणाचा तपास सुरू केला. १४ मार्च २०२३ रोजी पोलिसांनी सापळा रचून या हत्येतील मुख्य आरोपी प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे याला अटक केली. त्याच्यावर खून, चकमक आणि जाळपोळ यांसारखे अनेक गुन्हे दाखल होते. या हत्येतील आणखी एक प्रमुख आरोपी बिटलू मडावी हा मे २०२३ मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.
पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. शासनाने पीडित कुटुंबाला आठ लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली. मात्र, या कारवाईने साईनाथ परत येणार नव्हता आणि आर्थिक मदतीने उद्ध्वस्त झालेले कुटुंब पूर्वपदावर येणार नव्हते. त्याहून गंभीर बाब म्हणजे साईनाथच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या नक्षली दहशतीमुळे त्याच्या आई-वडिलांसह भावंडांना मर्दहूर गाव सोडावे लागले. गावातीलच नक्षलवाद्याने साईनाथची हत्या केल्याने गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीच्या सावटाखाली नरोटी कुटुंबाला आपल्या जन्मगावातून स्थलांतर करावे लागले.
तब्बल २५ एकर शेती असूनही दुसऱ्याच्या शेतात मजुरी
नरोटी कुटुंब आज अहेरी येथे पोलिसांच्या संरक्षणात वास्तव्याला आहे. मर्दहूर येथे त्यांचे घर आहे, २५ एकर शेती आहे; मात्र या मालमत्तेचा उपभोग घेण्यासाठी गावात परतण्याचे धाडस त्यांच्यात नाही. कुटुंबाला मिळालेली आठ लाख रुपयांची मदत जगण्याच्या गरजा भागविण्यात खर्च झाली. दुसरीकडे, कुटुंबातील इतर मुलांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागत आहे.
ज्या कुटुंबाकडे स्वतःची २५ एकर शेती आहे, त्या कुटुंबातील सदस्यांना दुसऱ्याच्या शेतात घाम गाळावा लागणे, ही केवळ आर्थिक परिस्थितीची शोकांतिका नाही; तर नक्षलवादी दहशतीने एका कुटुंबाचे सामाजिक आणि आर्थिक आयुष्य कसे विस्कटून टाकले, याचे विदारक वास्तव आहे.नरोटी कुटुंबातील वेदना त्यांच्या वडिलांच्या शब्दांतून अधिक तीव्रतेने समोर येतात. ते सांगतात, नक्षलवाद संपला असे म्हटले जाते; पण पीडितांच्या मनातील दहशत अजूनही संपलेली नाही. आम्हाला साईनाथच्या मृत्यूचा आर्थिक मोबदला मिळाला; पण तो पैसा जगण्यासाठी खर्च झाला. मर्दहूरमध्ये आमचे घर आहे, २५ एकर शेती आहे. मात्र, तिथे जाण्याची हिंमत होत नाही. माझ्या इतर मुलांना दुसऱ्याच्या शेतात कामाला जावे लागते. सरकार म्हणते नक्षलवाद संपला; पण आमच्या गावात नक्षली हिंसाचाराने निर्माण केलेली स्मशान शांतता आजही कायम आहे. घरदार आणि शेती-वाडी सर्वकाही असूनही आम्हाला निर्वासितांसारखे, शासनावर आश्रित राहून जगावे लागत आहे.
हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू केवळ मुलगा गमावल्याचे दुःख व्यक्त करत नाहीत, तर स्वतःच्या घरात पुन्हा कधी पाऊल ठेवता येईल, या अनिश्चिततेची वेदनाही सांगतात.
नक्षलमुक्तीच्या घोषणांपलीकडे पुनर्वसनाचे आव्हान
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाहिलेले नक्षलमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नक्षलवादाविरोधात व्यापक प्रयत्न झाले आहेत. त्यातून सशस्त्र नक्षलवादाला आळा घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळत आहे. मात्र, नक्षलवादाचा प्रभाव कमी होणे आणि नक्षलवादामुळे उद्ध्वस्त झालेली माणसे पुन्हा सामान्य आयुष्यात परतणे या दोन वेगळ्या बाबी आहेत, हे नरोटी कुटुंबाच्या परिस्थितीवरून स्पष्ट होते.
सुरक्षा मोहिमा, नक्षलवाद्यांवरील कारवाई आणि आत्मसमर्पणाच्या माध्यमातून नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न महत्त्वाचे आहेतच; पण त्याचवेळी नक्षलपीडित कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन, त्यांच्या मालमत्तेवरील हक्काची जपणूक, मुलांच्या शिक्षणाची व रोजगाराची व्यवस्था आणि गावात परतण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
साईनाथ नरोटीने पोलीस भरतीत सहभागी होऊन मुख्य प्रवाहात येण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याच स्वप्नासाठी त्याला प्राण गमवावे लागले. आज त्याचे कुटुंब मात्र त्याच मुख्य प्रवाहापासून दूर, स्वतःच्या गावात परतण्याच्या प्रतीक्षेत आहे. मर्दहूरमधील घराची दारे आणि शेतीची जमीन आजही त्यांच्या वाटेकडे पाहत आहेत. प्रश्न केवळ एका कुटुंबाच्या पुनर्वसनाचा नाही; तर नक्षलवादाच्या हिंसाचारात सर्वस्व गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला पुन्हा सुरक्षित आणि सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्याचा आहे.------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी