पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला निजामुद्दीन दर्ग्याला जाण्याची परवानगी नाही
सुरक्षेच्या कारणास्तव दर्गा भेटीचा प्रस्ताव भारताने फेटाळला नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) । भारताच्या दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी दिल्लीतील ऐतिहासिक हजरत
मुसादिक मसूद मलिक (पाकिस्तानी मंत्री)


सुरक्षेच्या कारणास्तव दर्गा भेटीचा प्रस्ताव भारताने फेटाळला

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) । भारताच्या दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी दिल्लीतील ऐतिहासिक हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याला भेट देण्याचा त्यांचा प्रस्ताव मात्र सुरक्षा कारणास्तव फेटाळण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केल्याने या निर्णयाची राजकिय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चा आहे.

पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित पहिल्या 'एससीओ सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम'मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला आग्रा येथील ताजमहाल, दिल्लीतील हुमायूँची कबर आणि दिल्ली हाट येथे भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दिल्लीतील प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याच्या प्रस्तावाला सुरक्षा यंत्रणांकडून मंजुरी मिळालेली नाही.

दर्गा भेटीला नकार, चर्चेला उधाण!

विशेष म्हणजे, भारताच्या सांस्कृतिक आणि सूफी परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाची इच्छा होती. मात्र, इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची परवानगी मिळूनही दर्गा भेटीला नकार मिळाल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यामागे सुरक्षेचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय संस्कृती समजून घ्यायची आहे

पाकिस्तानी मंत्री मुसादिक मसूद मलिक यांनी भारत दौऱ्यादरम्यान ताजमहाल, हुमायूँची कबर यांसह विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारताला जवळून पाहणे, येथील नागरिकांशी संवाद साधणे आणि भारतीय संस्कृती समजून घेणे, हा आपल्या भेटीमागील उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानी मंत्र्यांच्या भारत दौऱ्यावर कोणतेही सर्वसाधारण प्रवास निर्बंध नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

पाकिस्तानी मंत्र्याचा तीन वर्षांनी भारत दौरा

गेल्या तीन वर्षांतील एखाद्या पाकिस्तानी मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. शुक्रवारी नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे आयोजित तीन दिवसीय एससीओ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे प्रतिनिधी मंडळ दाखल झाले. विमानतळावर पाकिस्तान उच्चायोगाचे प्रभारी साद वडैच यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी पहिल्या 'एससीओ सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम'चे उद्घाटन केले.

सदस्य देशांमधील सामायिक सांस्कृतिक वारसा, कला, वास्तुकला, साहित्यिक परंपरा आणि लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करणे हा या तीन दिवसीय कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.एकीकडे सांस्कृतिक संवाद आणि परस्पर संबंध दृढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाच्या निजामुद्दीन दर्गा भेटीला सुरक्षा कारणास्तव नकार मिळाल्याने या दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande